पंचगंगा पात्राबाहेर, चहूबाजूला पाणीच पाणी!
पंचगंगा नदीची पाणीपातळी गुरुवारी सकाळी सहा वाजता 31.8 फुटांवर होती. सकाळी नऊ वाजता ती 32 फूट, तर दुपारी चार वाजता 33 फुटांवर गेली. यानंतरही पाणीपातळी वेगाने वाढतच होती. सहा वाजता पाणी पातळी 33.6 फुटांवर गेली. सायंकाळी सात वाजता पातळी 34 फुटांपर्यंत गेली. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर आज पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. दरम्यान राधानगरी धरणातून 1600 क्युसेक विसर्ग सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेचे पाणी इशारा पातळीकडे वाढत चालले आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दिवसभर हा पाऊस कोसळत होता. शहर आणि परिसरात पावसाचा जोर होता. तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. बहुतेक सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंचगंगा नदीलाही पूर आला आहे. पंचगंगेचे पाणी गुरुवारी रात्री गंगावेस-शिवाजी पूल या रस्त्यापर्यंत आले होते.
तिकडे झांबरे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने चंदगड-गोवा मार्ग ठप्प झाला आहे. यामुळं चंदगड तालुक्यातील 7 गावांचा संपर्क तुटला आहे. अणुस्कुरा घाटातही मोठ्या प्रमाणावर दरड कोसळली आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 37.15 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली. तिथे 91 मि.मी. पावसाची नोंद झाली. शाहूवाडीत 57 मि.मी., भुदरगडमध्ये 55 मि.मी., राधानगरीत 47 मि.मी., चंदगडमध्ये 37 मि.मी., पन्हाळ्यात 32 मि.मी., गडहिंग्लजमध्ये 23 मि.मी., कागलमध्ये 21 मि.मी., करवीरमध्ये 19 मि.मी., हातकणंगलेत 5 मि.मी., तर शिरोळमध्ये 4 मि.मी.पावसाची नोंद झाली.
धरणांच्या परिसरात अतिवृष्टी झाली. राधानगरी धरण परिसरात 125 मि.मी., कडवी परिसरात 112 मि.मी., कुंभी परिसरात 130 मि.मी., पाटगाव परिसरात 142 मि.मी., चिकोत्रा परिसरात 110 मि.मी., चित्री परिसरात 102 मि.मी., घटप्रभा परिसरात 109 मि.मी., जांबरे परिसरात 121 मि.मी., तर कोदे धरण परिसरात 215 मि.मी. पाऊस झाला. तुळशी परिसरात 73 मि.मी., वारणा परिसरात 74 मि.मी., दूधगंगा परिसरात 84, तर कासारी परिसरात 79 मि.मी.पाऊस झाला. जंगमहट्टी धरण परिसरात 45 मि.मी.पाऊस झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -