रत्नागिरीतील गुहागरमध्ये आढळला 'उडणारा मासा'!
या माशांची लांबी सुमारे 1 फूट आहे. त्याच्या पंखाना पेक्ट्रोल फीन्स असे म्हणतात.समुद्राच्या पाण्यावर 4 फूट उंचीवर ते जाऊ शकतात. हवेतून 200 मीटरचे अंतर हा मासा उडू शकतो.
समुद्रात मासेमारीला गेल्यावर अनेक वेळा पाण्यावरुन उडताना असे मासे दिसतात. परंतु हे मासे अर्थात फ्लाईंग फिश सहसा जाळ्यात अडकत नाहीत . मात्र यावेळी हे मासे असगोलीतील मच्छिमारांच्या जाळयात सापडले.
असगोली येथील स्थानिक मच्छिमार पहाटे तीन वाजता ‘गंगाकृपा’ ही होडी घेऊन मासेमारीसाठी गेले होते. रानवी ते असगोली या परिसरात समुद्रात मासेमारी करताना त्यांच्या जाळ्यात पंख असलेले दोन मासे सापडले.
जाळं ओढल्यावर जीवंत असलेल्या या माशांना त्यांनी होडीतील पाण्यात ठेवून दिलं होतं. सकाळी 8.30 च्या सुमारास मासेमारी संपवून ते असगोलीला परतले. त्यावेळी असगोलीतील समुद्रकिनार्यावर उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांनी पंख असलेले मासे दाखविले. त्यानंतर या माशांना समुद्रात सोडून जीवदान देण्यात आले.