मच्छीमारांचं 85 बोटींसह समुद्रात आगळं-वेगळं आंदोलन
पालघर जिल्ह्यातील दांडी, उच्छेळी आणि नवापूर या गावांमधील हजारो मच्छिमारांनी आज तब्बल 85 बोटी घेऊन समुद्रात आगळावेगळा आणि भव्य असा मोर्चा काढला होता.
मच्छीमारांना कोणतीही मदत मिळाली नसल्याने संतप्त झालेल्या मच्छीमारांनी समुद्रात केमिकल पाईप लाईनचे सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन निवेदन दिले.
नवापूरजवळ समुद्रात नवापूर केमिकल पाईपलाईनचे काम सुरु आहे. त्यामुळे मागील दीड ते दोन वर्षांपासून मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यातच यावर्षी झालेल्या चक्रीवादळ आणि महावादळामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याची शासन दरबारी कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.
मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळत नाही तोवर काम होऊ देणार नाही तसेच नुकसान भरपाई न देताच केमिकल पाईप लाईन सुरू केल्यास मच्छीमार कायदा हातात घेतील व त्याला सदर कंपनी आणि ठेकेदार जबाबदार असतील, असा इशारा मच्छीमारांकडून देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या.