कुठे कार्टून्स, तर कुठे रेन डान्स, शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्यांचं अनोखं स्वागत
मिकी-डोनाल्डसारख्या कार्टून्सच्या उपस्थितीत शाळा प्रशासनाकडून गुलाब पुष्प देऊन आणि ढोलताशे वाजवून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे.
मुलांना शाळा ही घरासारखी वाटावी आणि शाळेतला पहिला दिवस त्यांच्या कायमस्वरुपी आठवणीत राहावा, म्हणून राज्यातील वेगवेगळ्या शाळा वेगवेगळ्या पद्धतीने मुलांचे स्वागत करतात.
उन्हाळ्याची मोठी सुट्टी संपल्यानंतर राज्यभरातील शाळा आजपासून पुन्हा सुरु झाल्या आहेत. नवीन इयत्ता, नवे शिक्षक आणि पालकांना सोडून पुन्हा शाळेत जाताना चिमुरडे हमसून हमसून रडत आहेत. तर माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या भीतीने गोळा आला आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिलीतील विद्यार्थ्यांचं अनोखं स्वागत केलं. सुनेत्रा पवारांनी विद्यार्थ्यांना गुलाबाचं फूल देत, त्यांच्या हाताला धरत शाळेत आणलं.
धुळ्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गुलाब आणि पुस्तकांसोबत मिठाई देण्यात आली. धुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज हे दृश्य होतं.
औरंगाबादच्या मुकुल विद्यामंदिर शाळेने विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलं. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी रेन डान्सचं आयोजन केलं. पावसात भिजण्याचा आनंद म्हणजे मुलासाठी मज्जाच, त्यामुळे रेन डान्समध्ये भिजण्याचा मनसोक्त आनंद बालवाडीतील विद्यार्थ्यांनी घेतला.
दीर्घ सुट्टीनंतर जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे.
दीर्घ सुट्टीनंतर जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्यामुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे. मिकी-डोनाल्डसारख्या कार्टून्सच्या उपस्थितीत शाळा प्रशासनाकडून गुलाब पुष्प देऊन आणि ढोलताशे वाजवून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येत आहे.