भारताच्या ऐतिहासिक विजयात दिनेश कार्तिकचा विक्रमी षटकार!
दिनेश कार्तिकने एकोणिसाव्या षटकात 22 धावांची लूट केली. त्यामुळे टीम इंडियाला अखेरच्या षटकांत सहा चेंडूंवर बारा धावांची गरज होती. अखेरच्या चेंडूवर षटाकर ठोकून दिनेश कार्तिकने भारताला विजय मिळवून दिला.
दिनेश कार्तिक मैदानात उतरला त्या वेळी टीम इंडियाला विजयासाठी बारा चेंडूंत तब्बल 34 धावांची आवश्यकता होती. समोर नवखा विजय शंकर चाचपडत उभा होता. पण टीम इंडियाच्या सुदैवाने दिनेश कार्तिकला स्ट्राईक मिळाला आणि त्याने रुबेल हुसेनवर हल्ला चढवला.
अखेरच्या चेंडूवर 5 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची गरज असताना षटकार ठोकणारा तो आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या इतिहासातला पहिला खेळाडू ठरला आहे.
कोलंबोत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात बांगलादेशने भारताला विजयासाठी 167 धावांचं लक्ष्य दिलं होतं. अटीतटीच्या या सामन्यात दिनेश कार्तिकने विजय खेचून आणला.
दिनेश कार्तिकने 8 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.
दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर मारलेल्या षटकाराने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताला विजेतेपदाचा करंडक मिळवून दिला.