महाडमध्ये पूल वाहून गेला, 22 जण बुडाल्याची भीती
सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे महाड-पोलादपूर दरम्यानचा एक जुना पूल वाहून गेला. मध्यरात्री ही दुर्घटना घडली.
या पुलावरुन गोव्याकडून मुंबईकडे येणारी वाहनं जायची.. परिणामी हा पूल वाहून गेल्यानं काही काळ मुंबई-गोवा वाहतुकही ठप्प झाली होती.
हा पूल १०० वर्ष जुना असल्याची माहिती असून धोकादायक अवस्थेत हा पूल होता.
सध्या तरी किती प्रवासी पुरात वाहून गेले याचा कुठलाच अंदाज नाही. पण, सावित्री नदीच्या पाण्याचा प्रवाह बघता वाहून जाणाऱ्यांचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.
घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी पोहोचले आहेत... याशिवाय नौदल आणि एनडीआरएफची एक तुकडीही दुर्घटनास्थळी रवाना झालेली आहे.
घटनेची माहिती मिळताच सर्व बचावयंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र अंधार आणि पावसामुळे तात्काळ बचावकार्य सुरु करता आलं नाही.
वाहनांमध्ये राजापूर-बोरीवली आणि जयगड-मुंबई या दोन एसटी बस वाहून गेल्या. दोन्ही बसमध्ये एकूण 22 प्रवासी होते.
ज्यावेळी हा पूल वाहून गेला त्यावेळी या पुलावर 2 एसटी बस आणि 8 ते 10 छोटी वाहनंही होती. त्यामुळे पुलाबरोबरच ही वाहनं देखील या पुरात वाहून गेली आहेत.