महाराष्ट्राचा सुनीत जाधव भारत श्री!
महाराष्ट्राने दोन सुवर्णांसह दोन रौप्य जिंकले आणि सेनादलाने 2 सुवर्ण आणि 4 कांस्य जिंकत 45 गुण मिळवले.
90 ते 100 किलो वजनी गटातही असाच संघर्ष रेल्वेच्या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळाला. राम निवासने किरण पाटीलवर अनपेक्षित मात करीत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत धडक मारली. सर्वात हेवीवेट गटातही रेल्वेचाच जावेद अली खान सरस ठरला. त्याने महाराष्ट्राच्या झुबेर शेखला मागे टाकले. मुंबई श्री विजेता अतुल आंब्रेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कांस्य पदक दिल्लीच्या हिजबूर रहमानने मिळवले.
सर्वात चुरस पाहायला मिळाली ती 90 किलो वजनीगटात. अव्वल स्थानासाठी सुनीत जाधव, सागर जाधव, राजेंद्रन मणी आणि महेंद्र चव्हाण यांच्यात लढत रंगली. या गटात सारेच खेळाडू एकापेक्षा एक होते, पण सुनीत त्या चौघांपेक्षा किंचीत सरस वाटत होता. त्यामुळे शेवटचे तीन क्रमांक जाहीर झाल्यानंतर पहिल्या आणि दुसऱया स्थानासाठी दोन जाधवांमध्ये झुंज रंगली. यात सागरपेक्षा सुनीतच उजवा होता आणि गटविजेता जाहीर होण्यापूर्वीच प्रेक्षकांमधून सुनीत... सुनीत... चा जयघोष सुरू झाला.
तिसरा क्रमांक सेनादलाच्या दयानंद सिंग याने मिळविला तर बेस्ट पोझरचा पुरस्कार सर्बो सिंगने संपादला. सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडूचा बहुमान अनिल गोचीकरला देण्यात आला.
नियमित सात पोजेस नंतर जजेसनी सुनीत आणि राम निवासचे गुण समान झाल्यामुळे दोघांमध्ये कंपेरिझन मागितली आणि मग आपला निर्णय सुनीतच्या बाजूने दिला. रामनिवास उपविजेता ठरला. या निर्णयानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला. भारत श्रीचा बहुमान राखताच सुनीतच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
अंतिम फेरीसाठी पात्र झालेल्या खेळाडूंपैकी प्रत्येक गटात किमान तीन-चार विजेते दिसत होते. पूर्ण स्पर्धेवर रेल्वे, सेनादल आणि महाराष्ट्राच्याच खेळाडूंचे वर्चस्व दिसले.
भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत शिरपेचात मानाचा तुरा खोवत महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने सलग दुसऱ्यांदा बाजी मारली.