राज्यभरात अंगारकी संकष्टीचा उत्साह, मंदिरं भाविकांनी फुलली
आज राज्यभरात अंगारकी संकष्टी साजरी केली जात आहे. वर्षभरातील ही शेवटची अंगारकी संकष्टी असल्यामुळे भाविकांनी गणेश मंदिरांमध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.
वर्षातील शेवटची अंगारकी संकष्टी असल्याने सांगलीचे आराध्य दैवत असलेल्या आणि दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे गणपती मंदिर असलेल्या गणपती पंचायतन संस्थानच्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासून लांबच्या लांब रांगा लागलेल्या होत्या.
अंगारकीनिमित्त दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्यावतीने मंदिरात फुलांची आरास करण्यात आली. यामध्ये 6 हजार किलो फुले वापरण्यात आली आहेत. झेंडू ,शेवंती आणि गुलाब फुलांची आकर्षक आणि मनमोहक सजावट मंदिरावर आणि मंदिरात करण्यात आली.
आज वर्षातील शेवटची अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये भाविकांनी गर्दी केली. सोमवारी रात्री 12 वाजल्यापासून भक्तांनी मंदिरातील श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सुरुवात केली.
2018 या वर्षात तब्बल तीनवेळा अंगारकी संकष्ट चतुर्थी आली आहे. मंगळवारी येणाऱ्या संकष्टीदिवशी अंगारक योग समजला जातो. भाविक या संकष्टीची आतुरतेने वाट पाहात असतात.
मराठवाड्यातील प्रसिद्ध गणपती असलेल्या जालना जिल्ह्यातील राजूर गणपतीला आज अंगारकीनिमित्त गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. गणपतीच्या साडेतीन पीठापैकी अर्धपीठ म्हणून राजूरच्या राजुरेश्वर गणपतीला विशेष महत्व आहे.
अंगारकी संकष्टीच्या निमित्ताने गणरायाचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक सध्या गणपतीपुळ्यात दाखल झाले आहेत. जवळपास तीन लाख भाविक गणपतीपुळ्यात आलेत. आज पहाटे तीन वाजल्यापासून मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलंय.
दरवर्षी अंगारकीनिमित्त विदर्भ मराठवाड्यातील अनेक भाविक पायी चालत गणेशाच्या दर्शनाला येतात. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मध्यरात्री 12 च्या सुमारास राजूरमध्ये श्रींची आरती होते. सकाळी अभिषेक करुन बाप्पांची विधीवत पूजा देखील या ठिकाणी होते.
आज वर्षातील तिसरी आणि शेवटची अंगारकी संकष्टी असल्याने तसंच ख्रिसमसची सुट्टी असल्याने भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये पहाटेपासूनच रांगा लावल्या आहेत. अहमदनगरचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपती मंदिरातदेखील भाविकांची गर्दी झालेली आहे.