ABP Majha Bravery Award:'एबीपी माझा'कडून शौर्य पुरस्कारानं आठ शूरवीराचं सन्मान
संजना जेठू राव : पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील कर्हे गावातील आठ वर्षांची जागृती संध्याकाळी 5.30 सहाच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेली होती. पाण्याचा हंडा भरता भरता तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत कोसळली. तिथून काही अंतरावर असलेल्या 14 वर्षांच्या संजनाच्या लक्षात ही बाब आली आणि तिने तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. जागृती विहिरीत एका दगडावर थरथरत उभी होती. संजनाने तिला धीर दिला आणि विहीरीत उतरून जागृतीला खांद्यावर घेत वर आणले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोविड संकट काळात अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अशा घटनांमध्ये प्रसंगावधान राखून या देवदूतांनी सामाजिक बांधिलकी ठेऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवले आणि समाजासमोर मोठं काम उभं केलं. त्यांचा गौरव एबीपी माझाने केला आहे. या कार्यक्रमात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेता रितेश देशमुख उपस्थित होते.
कांता कलन : माहीम येथे फुटपाथवर राहाणाऱ्या कांत कलन फूल विकून चार जणांचा संसार सांभाळतात. मुंबईत पावसाने थैमान घातले होते आणि रस्त्याची नदी झाली तेव्हा पाणी ओसरावे म्हणून त्यांनी गटारावरचे झाकण काढले आणि त्यात गाड्या पडू नयेत म्हणून त्या मॅनहोलजवळ कोसळत्या पावसात पाय रोवून आठ तास उभ्या राहिल्या आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना धोक्याची जाणीव करून देऊ लागल्या.
नितीन नागोठकर : दादरच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडणारे कर्मचारी. कोरोना काळात कोरोना रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक येत नसल्याने त्यांनी अडीच हजार अनाथ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. याच दरम्यान त्यांनाही कोरोनाची लागण झाली. मात्र, उपचारानंतर हा अवलिया पुन्हा एकदा त्याच जोमाने कर्तव्यावर परतला होता.
लता बनसोडे : एमएसएफ महिला जवान लता बनसोडे ग्रँट रोड स्टेशनवर ड्युटीवर असताना प्लॅटफॉर्मवरुन चालणारा एक गृहस्थ चक्कर येऊन थेट रुळावर कोसळला. ही बाब लक्षात येताच लता बनसोडे यांनी तडक त्यांच्याकडे धाव घेतली. रुळावर उतरुन त्यांना सावरत असतानाच समोरुन वेगात येणारी लोकल थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुदैवाने मोटरमनने प्रसंग पाहून लोकलचा वेग नियंत्रणात आणला आणि मोठा धोका टळला.
नविद दुस्ते : समोर असलेली इमारत अवघ्या काही क्षणात कोसळणार आहे हे माहित असूनही इतरांना वाचवण्यासाठी नविद दुस्ते हिमतीने इमारतीत घुसला आणि इमारतीचा एक एक भाग ढासळत असतानाही त्याने जीवावर उदार होऊन लोकांना बाहेर येण्यासाठी ओरडून सतर्क केले. त्याने ३५ जणांचे प्राण वाचवले. मात्र याच दरम्यान इमारती कोसळली आणि इमारतीचा पिलार नविदच्या पायवर कोसळला. गंभीर जखमेमुळे त्याचा पाय कापून काढावा लागला. हे संकट कमी की काय म्हणून कोसळलेल्या इमारतीशेजारी त्याची इमारत असल्याने सुरक्षेच्या कारणावरून त्याला राहाते घरंही सोडावे लागले. कुटुंबासह तो रस्त्यावर आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्याला मदत करण्याचे आश्वासन या कार्यक्रमात दिले.
किशोर लोखंडे : बीड येथे राहाणारा किशोर गोवा महामार्गावर पोकलेन मशीन चालवण्याचे काम करीत होता. त्याचवेळी त्याला महाडमध्ये इमारत पडल्याचे समजले. किशोरला तडक तिकडे जाण्यास सांगितले. किशोर तिथे पोहोचला तेव्हा समोर दगड विटांचा डोंगर उभा होता आणि त्याखाली दबले होते काही जीव. त्या जीवांना वाचवण्यासाठी किशोरने तब्बल चाळीस तास पोकलेन मशीन चालवली. दगड विटांचा डोंगर उपसतच राहिला. त्याच्यामुळे अनेकांचे जीव वाचले.
गजराबाई : नातीला मृत्यूच्या जबड्यातून सोडवून साठ वर्षांच्या गजराबाईंनी सोडवून आणण्याची करामत केली होती. नाशिकजवळच्या शेवगे दारणा नावाच्या छोट्याशा खेड्यात चार वर्षांची समृद्धी घराबाहेर खेळत होती. तिच्यापासून काही फुटांवर बिबट्याच्या रुपात काळ उभा होता. बिबट्याने समृद्धीच्या दिशेने झेप घेतली. बिबट्या समृद्धीचा घास घेणार तोच गजराबाई धावून आल्या आणि त्यांनी बिबट्याच्या जबड्यातून समृद्धीला बाहेर खेचलं. समृद्धीला घराच्या आत ढकललं आणि त्या बिबट्यासमोर वाघिणीसारख्या उभ्या ठाकल्या. गजराबाईंच्या धाडसाने शक्तीशाली बिबट्याने माघार घेतली आणि धूम ठोकली.
पोलीस नाईक संजय चौगुले : पोलीस नाईक संजय चौगुले यांच्यामुळे सोलापूर महामार्गावर एक मोठा अपघात टळला. सोलापुरातील सावळेश्वर टोल नाक्यावर ते कर्तव्यावर असताना एक गॅस टँकर त्यांच्या दिशेने येताना त्यांना दिसला. टँकरकडे पाहाताच काहीतरी गडबड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. निरखून पाहिल्यानंतर त्यांना जाणवले की टँकरचा चालक बेशुद्ध असून टँकर नियंत्रणाबाहेर आहे. 30 किमी वेगात असलेल्या या टँकरमागे धावत जाऊन त्यांनी चालकाच्या दिशेने टँकरमध्ये प्रवेश केला. चालकाला बाजूला करून टँकर थांबवला. जर वेळीच संजय चौगुले यांनी प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठा अपघात झाला असता तो त्यांनी टाळला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -