Birthday Special | 'व्हाय दिस कोलावरी डी' गाण्याचं वेड लावणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेता धनुषचा आज वाढदिवस
धनुष म्हणायला मोठ्या दिग्दर्शकाचा मुलगा होता. पण तरीही त्याला टीका सहन करावी लागली. हिरो बनण्यासारखा तुझा चेहरा नाही, असे त्याला सर्रास ऐकवले जाई. पण तरिही आपल्या आत्मविश्वास जोरावर धनुषने साऊथ इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले.
'कोलावरी डी' या गाण्यानंतर धनुष प्रसिद्धीझोतात आला. हे गाणं स्वतः धनुषने लिहिले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, धनुषने या गाण्याचे बोल केवळ सहा मिनिटांत लिहिले होते. तर गाण्याच्या रेकॉर्डिंगला फक्त 35 मिनिटांचा कालावधी लागला होता.
वयाच्या 16 व्या वर्षी धनुषने वडिलांच्या 'थुल्लुवाधो इलामाई' या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे 'रांझणा' आणि 'षमिताभ' या बॉलिवूड चित्रपटांतही तो झळकला.
दाक्षिणात्य अभिनेता असलेल्या धनुषने बॉलिवूडमध्येही आपला ठसा उमटवला आहे. 'कोलावरी डी' या गाण्याने चाहत्यांच्या मनात वेगळी जागा निर्माण करणारा धनुष सुपरस्टार रजनिकांत यांचा जावई आहे.
धनुष फक्त अभिनेताच नाहीतर, प्रोड्यूसर, सॉन्ग रायटर आणि प्लेबॅक सिंगरही आहे. आदुकलम या चित्रपटासाठी धनुषला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.
28 जुलै 1983 रोजी जन्मलेल्या धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू कस्तुरी राजा आहे. साऊथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचा तो मुलगा आहे.
धनुष 2004 साली रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या हिच्यासोबत लग्नगाठीत अडकला. एका सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी दोघांची भेट झाली होती. हळूहळू दोघांमध्ये मैत्री वाढली. वर्षभरानंतर दोघे लग्नगाठीत अडकले. ऐश्वर्या धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे.
'कोलावरी डी' या गाण्याने प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता धनुष याचा आज वाढदिवस.