Zeeshan Siddique : "बाबा राज्यसभेवर जावे ही माझी देखील इच्छा आहे. मी सध्या तरी कोणत्या पक्षात जाण्याचा विचार केलेला नाही. मी सध्या काँग्रेसमध्येच आहे", असे काँग्रेस नेते झिशान सिद्दिकी म्हणाले आहेत. यावेळी बोलताना सिद्दिकी यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा पाढाच वाचला आहे. बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर झिशान कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, अजूनही काँग्रेसमध्येच आहे, असे झिशान यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस पक्षातील अनेक आमदार नाराज
झिशान सिद्दिकी म्हणाले, काँग्रेस पक्षातील नेते सोडून जात आहेत, याचा पक्षाने विचार करायला हवा. काँग्रेस पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. कोणत्या कारणास्तव ते जात आहेत त्याच्यावर पक्षात चर्चा व्हायला हवी. आम्ही देखील अनेक कारण अनेकदा सांगितलेली आहेत. मात्र पक्षश्रेष्ठींपर्यंत ती पोहोचत नाहीत. पुढे बोलताना सिद्दिकी म्हणाले, आजच्या होणाऱ्या बैठकीला देखील मी जात आहे. आज देखील बैठकीत मी माझ्या मनात असलेले मुद्दे मांडेन. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, असे झिशान सिद्दिकी यांनी स्पष्टपणे सांगितले.
'अशोक चव्हाण यांच्या रुपाने काँग्रेसला मोठा धक्का'
महाविकास आघाडीला भविष्य आहे का? याबद्दल मी बोलणार नाही. मात्र या युतीमुळे पक्षाचं नुकसान होत आहे. अशोक चव्हाण यांच्यासारखे नेते गेल्याने काही फरक पडणार नाही असं आमचे नेते सांगतात. मात्र मोठा धक्का हा काँग्रेसला आहे. आणखी अनेक आमदार नाराज आहेत, असही झिशान यांनी नमूद केले.
'मुंबई काँग्रेसच्या युवक कमिटी बैठका देखील माझ्याशिवाय होतात'
हंडोरे यांना मागील वेळी अशा राजकारणामुळेच पराभव पत्करावा लागला मात्र यावेळी ते विजयी होतील. मुंबई काँग्रेसच्या युवक कमिटी बैठका देखील माझ्याशिवाय होतात, त्यामुळे हे सगळं बदलायला हवं. मी लोकांसाठी काम करतोय पुढे बघू मात्र सध्या तरी काँग्रेसमध्येच आहे, असेही झिशान सिद्दिकी यावेळी बोलताना म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या