Sanjay Gaikwad : गृहराज्यमंत्री म्हणाले, संजय गायकवाडांविरुद्ध तक्रार नाही, कारवाई करु शकत नाही, मुख्यमंत्री म्हणाले, कारवाई होईल!
आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात कोणाचीही तक्रार आली नाही. त्यामुळे कारवाई करु शकत नाही, असे योगेश कदम यांचे म्हणणे आहे मात्र या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहे.

Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनीआमदार निवास येथील कँटिनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणावरून कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आमदार गायकवाड यांच्यावर सर्वत्र टीका होताना दिसत आहे. तर या प्रकरणाचे पडसाद आता पावसाळी अधिवेशनातही (Monsoon Session 2025)उमटताना दिसत आहे.
अशातच, या प्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अजब दावा केला आहे. आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात कोणाचीही तक्रार आली नाही. त्यामुळे कारवाई करु शकत नाही, असे योगेश कदम यांचे म्हणणे आहे. मात्र या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया देताना कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत.
आमदार गायकवाडांविरुद्ध तक्रार नाही, कारवाई करु शकत नाही- योगेश कदम
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आमदार निवास हे अध्यक्षांच्या अखत्यारीत येतं. अशात, ते जो निर्णय घेतील तो अंतिम असेल. मात्र यात अद्याप तक्रारच आलेली नाही आहे. तक्रार आली तर गुन्हे दाखल होईल. विधिमंडळाच्या आवारात ही घटना घडली आहे. मुख्यमंत्र्यांनी पण हेच सांगितलं आहे. मात्र तक्रारच दाखल नाही झाली आहे, झाली तर गुन्हा दाखल होईल असेही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितलं. मात्र मारहाणीचा स्पष्ट पुरावा असतानाही कारवाई होत नसेल तर गृहराज्यमंत्र्यांकडून गायकवाड यांची पाठराखण होतेय का? असा सवाल देखील आता विचारला जाऊ लागला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहे. पण काही कॉग्निसेबल ओफ्फेंस (Cognizable offence) असतात आणि काही नॉन कॉग्निसेबल ओफ्फेंस असतात. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणी कारवाई करू द्या, नक्कीच पोलीस योग्य ती कारवाई करतील. यात फ़ोर्स किती अप्लाई केला आहे हे ही पाहिले जाईल. अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
कारवाईसंदर्भात अद्याप संभ्रम कायम
असे असले तरी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोटा ठरवला आहे. चौकशीसाठी कुणी तक्रार करायलाच हवी असे नाही, पोलीस स्वतः चौकशी करू शकतात आणि ते नक्की करतील, असे स्वत: मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांकडूनच चौकशी आणि कारवाईच्या कालावधीसंदर्भात स्पष्टता नसल्याने अधिक आणि संजय गायकवाड यांच्यावर आता नेमकी काय कारवाई होणार याबद्दल कळू न शकल्याने संभ्रम कायम आहे.
हे ही वाचा
























