यवतमाळ : बँकेत वा कोणत्याही सरकारी कार्यालयात जर तुम्ही कामानिमित्त दुपारी गेला आणि नेमकं त्याचवेळी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची वेळ झाली तर तुम्हाला ताटकळत रहावं लागत. आपलं काम असल्याने कितीही वैताग आला तरी काही बोलता येत नाही. पण बँकेचा हा अनुभव यवतमाळ जिल्ह्यातल्या मतदारांना मतदान केंद्रावर आला. यवतमाळमधील हिवरी मतदान केंद्र (Yavatmal Hiwari Polling Station) हे जेवणासाठी सुमारे 25 मिनिटे बंद करण्यात आलं होतं. त्यामुळे आपली कामं बाजूला सारून लोकशाहीचं कर्तव्य बजावण्यास गेलेल्या मतदारांना मात्र चांगलच ताटकळत बसावं लागलं. 


यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघसाठी मतदान सुरू असताना यवतमाळच्या हिवरी येथे मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदानाच्या वेळेत कर्मचारी हे मतदान केंद्राच्या आतच भोजनासाठी बसल्याने दुपारी 2.10 ते 2.35 असे 25 मिनिटं मतदान प्रक्रिया बंद होती. त्यावेळी मतदानासाठी आलेल्या वृद्ध महिला आणि इतर नागरिक हे ताटकळत केंद्राच्या बाहेर बसले होते. कर्मचाऱ्यांचं भोजन झाल्यानंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.


दरम्यान मतदानासाठी आलेल्या महिला आणि पुरुष मतदारांना ताटकळत बसून राहावे लागत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे निवडणूक विभाग आता या मतदान केंद्रावर काय कारवाई करणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. 


मतदान केंद्र दुपारच्या जेवणासाठी बंद करू शकतात का? 


लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक गोष्टी केल्या जातात, अनेक आवाहनं केली जातात. त्यासाठी मतदान केंद्रावर मतदारांना कोणत्याही अडचणी येऊ नये याची दक्षता घेतली जाते. सरकारी कर्मचारी आणि खासगी नोकऱ्या करणाऱ्या पगारी सुट्ट्या दिल्या जातात, किंवा मतदानासाठी काही वेळ दिला जातो. पण ग्रामीण भागातील शेतकरी असतील वा शेतमजूर असतील किंवा लहान लहान कामधंदे करणारे लोक असतील, त्यांना मात्र त्यांच्या कामातून वेळ काढून मतदानकेंद्रावर जावं लागतं.


निवडणूक आयोगाचे निर्देश काय? 


या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन निवडणूक आयोगाकडून काही निर्देश देण्यात आलेले असतात. त्यामध्ये निवडणूक कर्मचाऱ्यांना जेवणाचा भत्ता दिला जातो. पण त्यांच्या कामाच्या ठिकाणीच त्यांची जास्तीत जास्त सोय होईल यासाठी एका स्थानिक शिपायाचीही नियुक्ती करण्यात आलेली असते. जेणेकरून नाश्ता किंवा जेवणाच्या वेळीही मतदान प्रक्रिया सुरूच राहील.एकत्रित जेवण्यापेक्षा एकेक करून जेवण्यास प्राधान्य द्यावं, जेणेकरून मतदानाच्या प्रक्रियेत खंड पडणार नाही असे निर्देश दिले जातात.


यवतमाळमधील हिवरी मतदान केंद्रात मात्र या निर्देशांचं पालन करण्यात आलेलं नसल्याचं दिसतंय. बाहेर मतदार, त्यामध्ये वृद्ध महिलांचाही समावेश आहे, ताटकळत बसले असताना कर्मचारी मात्र एकत्रित बसून जेवण करताना दिसत आहेत.  त्यामुळे मतदान प्रक्रिया मात्र थांबल्याचं दिसतंय. याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने त्यावर निवडणूक आयोग आता काय कारवाई करणार हे पाहावं लागेल. 


ही बातमी वाचा :