Yavatmal Washim : भावना गवळी वि. संजय राठोड, यवतमाळ-वाशिमच्या राजकारणात सुप्त स्पर्धा, टोकाचा संघर्ष, तरीही राजकीय परिपक्वता
Yavatmal Washim Lok Sabha Election : भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यातील राजकीय संघर्ष आता लोकसभेच्या निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे.
यवतमाळ : जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) आणि राज्याचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत. त्यांच्यातील राजकीय संघर्षाने अनेकदा टोक गाठलं. असं असलं तरीही या दोघांनी अनेक पातळीवर मर्यादा पाळत एक वेगळीच राजकीय परिपक्वता दाखवल्याचं दिसून येतंय.
भावना गवळी सलग 25 वर्षापासून लोकसभेच्या खासदार, तर संजय राठोड सलग 20 वर्षांपासून विधानसभेचे आमदार. शिवसेना हेच दोघांचे राजकीय पक्ष. यवतमाळ आणि वाशीम हेच दोघांचे राजकीय कार्यक्षेत्र. त्यामुळे दोघांचे प्रदीर्घ अनुभव पाहता, दोघेही एकाच पक्षातील आणि एकाच राजकीय क्षेत्रात असताना दोघे एकमेकांशी पूरक राजकारण करतच इथवर पोहोचले असावे असा अंदाज कोणीही बांधेल. मात्र किमान सध्या तरी राजकीय वस्तुस्थिती तशी नाही. यवतमाळ वाशिममधील या दोन दिग्गज नेत्यांमधले राजकीय समीकरण कसे आहेत ते पाहुयात.
दोन नेत्यांमध्ये पक्ष विभागला
यवतमाळ आणि वाशिम पश्चिम विदर्भातले दोन महत्त्वाचे जिल्हे. शेतकरी आत्महत्यांसाठी हे दोन्ही जिल्हे नेहमीच चर्चेत असतात. तेवढीच चर्चा होते इथल्या खासदार भावना गवळी आणि यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या राजकीय स्पर्धेची. एकाच पक्षात बरेच वर्ष राजकारण करत असताना दोन दिग्गज नेत्यांमध्ये राजकीय स्पर्धा असतेच, मात्र भावना गवळी आणि संजय राठोड यांच्या मधली ती राजकीय स्पर्धा त्या पलीकडची आहे. गेली कित्येक वर्ष दोघे क्वचितच एका मंचावर येतात. दोन्ही जिल्ह्यात दोघांचे संघटनात्मक कामे स्वतंत्रपणे चालतात. दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही फारशी एकी दिसून येत नाही. त्यामुळे गेले कित्येक वर्षे शिवसेना यवतमाळ आणि वाशीम या दोन जिल्ह्यात दोन नेत्यांमध्ये विभागली गेली आहे.
गवळी - राठोड यांच्यातील वादाची कारणे
- भावना गवळी 1999 पासून खासदार आहेत तर संजय राठोड 2004 पासून आमदार आहेत. म्हणजेच दोघांचा राजकीय अनुभव जवळपास सारखा आहे.
- पाच वेळा खासदार होऊनही भावना गवळी अद्यापही केंद्रात मंत्री होऊ शकल्या नाहीत.
- मात्र संजय राठोड तिसऱ्यांदा आमदार होताच फडणवीस सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्री पद मिळाले होते.
- पुढे संजय राठोड यांच्या वाट्याला आधी यवतमाळचे आणि नंतर वाशिमचे पालकमंत्री पदही गेले.
- राजकीय विश्लेषकांच्या मते, दोघांमधल्या संघर्षाचा राठोड यांना मिळालेलं मंत्रीपद आणि गवळींना कधीच न मिळालेला मंत्रीपद एक कारण आहे.
- दोन्ही जिल्ह्यातील प्रशासनावर आणि कार्यकर्त्यांवर कोणाचा वर्चस्व असेल यावरही दोघांमध्ये छोट्या छोट्या मुद्द्यांवर ठिणगी पडत असते.
भावना गवळींचे तिकीट कापणार?
लवकरच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. यवतमाळ - वाशिम मतदारसंघ पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यास इथे भावना गवळी उमेदवार राहतील की त्यांच्या जागी संजय राठोड यांना संधी दिली जाईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. हेही दोघांमधल्या वाढत्या अंतराचा एक कारण आहे.
दोन्ही जिल्ह्यांवर संजय राठोड यांचे वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न
संजय राठोड हे महाराष्ट्राच्या राजकारणात जास्त रमले असून त्यांची ही लोकसभेच्या माध्यमातून दिल्लीला जाण्याची इच्छा नाही. मात्र दोन्ही जिल्ह्यांच्या राजकारणात त्यांचा वर्चस्व कायम राहील याची पुरेपूर काळजी ते घेत आहेत. पंतप्रधान मोदी यवतमाळमध्ये येत असताना कार्यक्रमाची सर्व सूत्रे पालकमंत्री या नात्याने संजय राठोड यांच्याच हाती आहे.
भाजपचा मतदारसंघावर डोळा
दरम्यान, दोघांमधील या संघर्षात भाजप सुप्तपणे का होईना संजय राठोड यांच्या बाजूने दिसून येत आहे. भाजपला यवतमाळ वाशिम हे मतदारसंघ आपल्या ताब्यात हवं आहे. सध्या भाजप नेते कार्यकर्त्यांची इच्छा ही यवतमाळ वाशिमचा खासदार भाजपचा असावा असे सांगून गवळी यांच्या उमेदवारीचा विरोध करत आहेत. महायुतीच्या जागा वाटपात यवतमाळ- वाशिम मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आल्यास संजय राठोड यांना अनुकूल असलेला उमेदवार इथे दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोघांचीही राजकीय परिपक्वता
भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांची राजकीय स्पर्धा असतानाही जेव्हा जेव्हा दोघेही राजकीय दृष्टिकोनातून अडचणीत सापडतात, तेव्हा दोघेही एकमेकांच्या विरोधात कडवट भूमिका न घेता अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दोघांमधली राजकीय स्पर्धा सर्वांना दिसत असली तरी राजकीय दृष्टिकोनातून एकमेकांना मर्यादा पलीकडे अडचणीत आणायचे नाही आणि एका मर्यादा पलीकडची टीका करायची नाही हे पथ्य दोघांनी गेले अनेक वर्ष पाळले आहे. राजकीय स्पर्धा असतानाही एक वेगळी राजकीय परिपक्वता दोघांनी दाखवली आहे हे विशेष.
ही बातमी वाचा: