शांघाय :चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. प्रमुख राजकीय सल्लागार पदावरील जनरल झाओ जोंगकी यांना त्यांच्या पदावरुन हटवण्यात आलं आहे. डोकलाम संघर्ष आणि भारताविरोधात ऑपरेशन गलवानचा आदेश दिल्यानं झाओ जोंगकी यांनी चर्चेत आले होते. गलवान खोऱ्यातील संघर्षावेळी झाओ जोंगकी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या पश्चिम कमांडचे प्रमुख होते. भारताला धडा शिकवण्यासाठी झाओ जोंगकी यांच्याकडून गलवान ऑपरेशनला मंजुरी देण्यात आली होती.
झाओ जोंगकी यांना चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिटव्ह कॉन्फरन्सची मेंबरशीपवरुन हटवण्यात आलं आहे. याशिवाय त्यांना इतर दोन पदांवरुन हटवण्यात आलं आहे. शी जिनपिंग यांच्या भ्रष्टाचार विरोधी अभियानादरम्यान शिस्त आणि कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दोन इतर वरिष्ठ जनरल, झांक यूक्सिया आणि लियू झेनली यांना केंद्रीय सैन्य आयोगातून हटवण्यात आलं आहे.
2017 मध्ये डोकलाममध्ये चीन आणि भारताचे सैनिक आमने सामने आले होते. चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये 72 दिवस संघर्ष सुरु होता. तेव्हा झाओ वेस्टर्न थिएडरचे नेतृत्व करत होते. मे 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये संघर्ष झाला होता तेव्हा झाओ प्रभारी होते. पुढच्याच महिन्यात गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये तीव्र संघर्ष झाला होता.
झाओकडून ऑपरेशन गलवानला मंजुरी
एएनआयच्या रिपोर्टनुसार अमेरिकेच्या गोपनीय अहवालाचा दाखला देत एक दावा करण्यात आला आहे. भारताला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन गलवानला झाओ जोंगकी यांनी मंजुरी दिली होती.
मे 2020 मध्ये झाओच्या कार्यकाळात लडाखमध्ये संघर्ष सुरु झाला होता. त्यानंतर पीएलएनं लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर काही ठिकाणी सैन्य तैनात केलं होतं. 15 जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये संघर्ष झाला होता, त्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्या घटनेनंतर भारत आणि चीनमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. भारतानं चायनीज कंपन्यांच्या मोबाइल एप्सवर बंदी घातली होती. तर, भारत-चीन विमानसेवा देखील बराच काळ बंद होती.
