US-Iran War: पश्चिम आशियातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून राजकीय घडामोडी आणि लष्करी हालचाली एकाच वेळी सुरू असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. इराण (Iran) आणि अमेरिका (America) यांच्यातील चर्चा इस्लामाबाद येथे निष्फळ ठरल्यानंतर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनली आहे. त्याचवेळी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात आज अमेरिकेत शांतीवार्ता होण्याची शक्यता आहे. या बैठकीत दोन्ही देशांचे राजदूत सहभागी होणार असून अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो उपस्थित राहू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.
मात्र या संभाव्य शांतीवार्तेला हिजबुल्ला या संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. संघटनेच्या नेतृत्वाने इस्रायलसोबत कोणतीही चर्चा न करण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, इस्रायली सैन्याकडून लेबनॉनमधील हल्ले सुरूच असून हिजबुल्लाच्या तळांवर बॉम्बहल्ल्यांची मालिका सुरू आहे. या कारवाईत अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्याचं वृत्त आहे.
US-Iran War: इराणची पाच देशांकडे नुकसान भरपाईची मागणी
दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हारोव्ह यांच्यात फोनवरून चर्चा झाली. युद्ध थांबवण्यासाठी पुढील मार्ग काय असू शकतो, यावर या चर्चेत विचारविनिमय झाल्याचं समजतं. याचदरम्यान इराणने शांती प्रक्रियेसाठी नवीन अट पुढे केली आहे. महायुद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी इराणने पाच देशांकडे केली आहे. यात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, बहरैन आणि जॉर्डन यांचा समावेश आहे. या देशांनी अमेरिकेला साथ दिल्याचा आरोप करत इराणने भरपाईची मागणी केली आहे.
US-Iran War: इराण-अमेरिका चर्चा होण्याची शक्यता
दरम्यान, पुन्हा एकदा इराण-अमेरिका चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चर्चेसाठी पाकिस्तान, तुर्की, इजिप्त आणि सौदी अरेबिया मध्यस्थी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्र संघटनेनेही दोन्ही देशांना पुन्हा चर्चेचा मार्ग स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे.
US-Iran War: अमेरिकेकडून होर्मुझ सामुद्रधुनीत नाकाबंदी
याचवेळी सर्वात मोठी घडामोड म्हणजे होर्मुझ सामुद्रधुनी परिसरातील तणाव. अमेरिकेने येथे नाकाबंदीची तयारी सुरू केली असून अमेरिकन नौदल अॅक्शन मोडमध्ये असल्याचं वृत्त आहे. इराणच्या तेल निर्यातीवर अंकुश ठेवण्यासाठी ही रणनीती आखली जात असल्याचं सांगितलं जात आहे. इराणकडून होणारी तेल, पेट्रोकेमिकल्स, सिमेंट, स्टील आणि सुकामेवा यांची समुद्रमार्गे होणारी निर्यात रोखण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. यासाठी सुमारे 15 युद्धनौका तैनात केल्या जाऊ शकतात, ज्यात विमानवाहू नौकेचाही समावेश असू शकतो.
US-Iran War: भारत, चीन आणि पाकिस्तानला मोठा फटका?
या तणावाचा थेट परिणाम जागतिक व्यापारावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः भारत, चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना मोठा फटका बसू शकतो. दरम्यान, काही जहाजांनी होर्मुझ मार्ग टाळल्याची माहिती समोर आली आहे. चीनकडे जाणाऱ्या जहाजांनी शेवटच्या क्षणी मार्ग बदलल्याने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित होते.
US-Iran War: मध्यपूर्वेत तणाव शिगेला
दरम्यान, आंतरराष्ट्रीय राजकारणात आणखी एक वाद पेटला आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि पोप लिओ यांच्यातील वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला आहे. पोप यांनी युद्धाला विरोध केल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली, तर अमेरिकेतूनच ट्रम्प यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. मात्र ट्रम्प यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. एकूणच, एका बाजूला शांती चर्चांचे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला लष्करी हालचाली आणि आर्थिक नाकाबंदीमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. परिस्थिती कोणत्या दिशेने वळते, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून आहे.
आणखी वाचा
