War Impact On Under Sea Cable नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळं सुरुवातीला एलपीजी पुरवठा ठप्प झाला होता. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण सोबतची शस्त्रसंधी अनिश्चित काळासाठी सुरु ठेवली जाणार असल्याचं म्हटलंय. मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी झालेला नाही. याशिवाय अमेरिका आणि इराण यांच्यात दुसऱ्या फेरीची शांतता चर्चा कधी होणार हे देखील स्पष्ट झालेलं नाही. अमेरिकेनं होर्मुझची सामुद्रधुनी अडवून धरली आहे. यामुळं इराणकडून देखील नवी खेळी करण्यात आली आहे. इराणच्या आयआरजीसीकडून आता होर्मुझच्या सामुद्रधुनीत असलेल्या इंटरनेट केबलला टार्गेट केलं जाऊ शकतं. इराणकडून समुद्रातील इंटरनेट केबलचं नुकसान करण्यात आल्यास भारतासह काही देशांमध्ये इंटरनेट ठप्प होऊ शकतं.
इराणनं इंटरनेट केबलवर हल्ले केल्यास काय?
मीडिया रिपोर्टनुसार, होर्मुझची सामुद्रधुनी आणि लाल समुद्रात ऑप्टिकल फायबर केबलचं जाळं आहे. या केबलमधून बहुतांश देशांमध्ये इंटरनेट पोहोचतं. या भागातून जाणाऱ्या केबलमुळं आशिया, यूरोप आणि आफ्रिका या सारख्या देशांना इंटरनेट कनेक्टव्हिटी मिळते. होर्मुझच्या सामुद्रधुनीत टाटा TGN गल्फ, गल्फ ब्रिज इंटरनॅशनल केबल सिस्टीम्स, FALCON आणि AAE-1 या सारख्या मोठ्या कंपन्यांच्या केबल सिस्टीम्स आहेत. याद्वारे मोठ्या कंपन्यांच्या डेटा सेंटरला इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवली जाते.
इराणनकडून होर्मुझची सामुद्रधुनी युद्ध थांबवण्यासाठी दबाव वाढवण्याचा भाग म्हणून बंद केली होती. आता अमेरिकेनं देखील होर्मुझच्या सामुद्रधुनीत नाकाबंदी केली आहे. या मार्गातून सागरी वाहतूक जवळपास बंद झाली आहे. इराणनं या मार्गात मॉइन्स देखील पेरले असल्याचे रिपोर्ट आले होते, त्यामुळं संकट वाढलं आहे. याशिवाय लाल समुद्रातील अल-मंडेब चामार्ग देखील सुरक्षित राहिला नव्हता.
मीडिया रिपोर्टनुसार इराणकडून अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इंटरनेट केबलला निशाणा केलं जाऊ शकतं. इंटरनेट केबलचं नुकसान झाल्यास त्याच्या दुरुस्तीला खूप वेळ लागू शकतो. सध्या होर्मुझमध्ये जहाजं जात नसून केबलचं नुकसान झाल्यास त्याच्या दुरुस्तीसाठी वेळ लागेल.
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील दुसऱ्या टप्प्यातील शांतता चर्चेबाबत पाकिस्तान आशावीद असल्याचं दिसतं. मात्र, अमेरिका आणि इराण यांची चर्चेसाठी सहमती होताना दिसत नाही. याशिवाय इराणच्या आयआरजीसीकडून भारताकडे येणाऱ्या जहाजावर हल्ला करुन ते ताब्यात घेतल्याचं काल समोर आलं होतं. ते जहाज दुबईतून गुजरातकडे निघालं होतं.
