US Iran War न्यूयॉर्क: अमेरिका आणि इराण यांच्यातील पाकिस्तानमधील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा तणाव वाढलेला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धात आता चीनला ओढण्याचा प्रयत्न केला आहे. चीन येत्या काही दिवसात इराणला नवी एअर डिफेन्स सिस्टीम देण्याची तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी चीनवर 50 टक्के टॅरिफ लादण्याची धमकी दिली आहे.
ट्रम्प चीनबद्दल काय म्हणाले?
डोनाल्ड ट्रम्प यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलं की, जर चीन देखील इराणला मदत करणार असेल किंवा लष्करी उपकरणं पाठणाऱ्या देशांमध्ये सामील झाला तर त्यांच्यावर 50 टक्के टॅरिफ लादलं जाईल का? यावर ट्रम्प यांनी आणखी काही देश मात्र चीन देखील असं म्हटलं. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन इराणला मदत करत असल्याच्या बातम्या फेटाळल्या मात्र, ते जर सत्य ठरलं तर त्यांच्यावर टॅरिफ लादलं जाईल, असं ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प म्हणाले की माझ्यासाठी कोणताही न्यूज रिपोर्ट महत्त्वाचा नाही कारण ते बऱ्याचदा ते खोटे असतात. मात्र, मी ऐकलंय की चीन शोल्डर मिसाइल देत आहेत. मला वाटत नाही की ते असं करतील कारण माझे त्यांच्यासोबत संबंध आहेत. कदाचित सुरुवातीला त्यांनी मदत केली असेल मात्र आता ते करणार नाहीत. ते असं करताना सापडले तर त्यांच्यावर 50 टक्के टॅरिफ लादलं जाईल, ते अधिक असेल, असं ट्रम्प यांनी म्हटलं.
ट्रम्प यांच्याकडून धमकीनंतर ऑफर
डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा चीनला टॅरिफची धमकी दिली आणि त्यानंतर अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीची ऑफर दिली. ते म्हणाले की चीन त्यांची जहाजं आमच्याकडे पाठवू शकतात, व्हेनेझुएलाकडे देखील पाठवू शकतात. आम्ही त्यांना व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करायला सांगत आहोत. आमच्याकडे तेलाचं उत्पादन अधिक आहे, आम्ही त्यांना तेलाची विक्री करु, कमी दरात करु, असं ट्रम्प म्हणाले.
सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार चीन पुढील काही आठवड्यांमध्ये इराणला खांद्यावरुन मारा करता येणाऱ्या अँटी मिसाइल सिस्टीम पाठवू शकते. चीन ही शस्त्र दुसऱ्या देशामार्फत पाठवू शकते, अशी चर्चा आहे. यासंदर्भात बोलताना ट्रम्प म्हणाले की चीननं जर तसं केलं तर त्यांच्या अडचणी वाढतील. दुसरीकडे वॉशिंग्टन येथील चीनच्या उच्चायुक्तांनी हे आरोप फेटाळले आहेत. चीननं या संघर्षात कोणालाही शस्त्र दिली नसून यासंदर्भातील बातम्या चुकीच्या असल्याचं ते म्हणाले.
