US- Iran Ceasefire: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणसोबतचा युद्धविराम (US- Iran Ceasefire) वाढवला आहे. पाकिस्तानच्या विनंतीनुसार हा युद्धविराम वाढवण्यात आला. सध्याचा युद्धविराम संपण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वीच, पाकिस्तानच्या विनंतीवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवल्यानंतर विविध शंका उपस्थित होत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी वाढवण्यावर अनेक शंकाकुशंका व्यक्त करण्यात येत आहेत. क्षेपणास्त्रांचा साठा संपल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधी वाढवल्याची चर्चा सुरु आहे. अमेरिकेतल्या मीडियामध्ये क्षेपणास्त्रटंचाईच्या बातम्या सुरु आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे क्षेपणास्त्रनिर्मिती कंपन्यांनी वेळ मागितला आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धविराम वाढल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, अपेक्षित क्षेपणास्त्रनिर्मितीसाठी एक ते दोन वर्षे लागणार असल्याचं सांगण्यात येत आहे. (US- Iran Ceasefire)

डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले? (US- Iran War)

सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणच्या सरकारमध्ये तीव्र मतभेद आहेत, हे आमच्या लक्षात आले आहे. पाकिस्तानचे फील्ड मार्शल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मला युद्धविराम वाढवण्याची विनंती केली होती. इराणचे नेते आणि प्रतिनिधी जोपर्यंत एकमताने एखादा प्रस्ताव सादर करत नाहीत, तोपर्यंत इराणवर हल्ले न करण्याची विनंती आम्हाला करण्यात आली आहे. मी हा युद्धविराम वाढवत आहे. तिथल्या नेत्यांना एक संधी देण्यासाठी अमेरिकेने हल्ले थांबवले आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. नाकेबंदी (blockade) कायम ठेवावी आणि इतर कोणत्याही संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असे निर्देश मी माझ्या लष्कराला दिले आहेत, अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मानले आभार- (Pakistan On US- Iran War)

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी म्हटले की, युद्धविराम वाढवण्याची पाकिस्तानची विनंती मान्य केल्याबद्दल आणि त्यामुळे सुरू असलेल्या राजनैतिक प्रयत्नांना पुढे नेण्याची संधी दिल्याबद्दल, मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मनापासून आभार मानतो. या संघर्षावर वाटाघाटींद्वारे तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान आपले सर्वतोपरी प्रयत्न सुरूच ठेवेल.

शस्त्रसंधी वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या- (Crude oil prices)

अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी वाढल्याने कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या आहेत. कच्चे तेल प्रति बॅरेल 101 डॉलर्सवरुन 90 डॉलर्सपर्यंत घसरले आहेत. अमेरिकेच्या कच्च्या तेलाच्या किंमतीही 95 डॉलर्सवरुन 88 डॉलर्सवर पोहोचले आहे. मात्र होर्मुझमधली नाकेबंदी कायम असल्यानं तेल व्यापाराला मर्यादा असणार आहे.

संबंधित बातमी:

US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...