US attacks on Iran : इराण आणि इस्रायलमधील (Iran Vs Israel War) सुरू असलेल्या संघर्षात आता अमेरिकेने (America) थेट सहभाग घेतला आहे. रविवारी पहाटे अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी इराणमधील (Iran) तीन महत्त्वाच्या आण्विक तळांवर जोरदार हल्ला केला, यामुळे मध्यपूर्वेत मोठ्या युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी ट्विट करून इराणवरील हल्ल्याची माहिती दिली आहे. तर अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या आण्विक तळांवरील हवाई हल्ल्यानंतर अमेरिका कमालीची सावध झाली आहे. न्यूयॉर्क (New York) आणि वॉशिंग्टन डीसीमध्ये (Washington DC) धार्मिक, सांस्कृतिक स्थळांवर लष्करी फौजा दाखल झाल्या असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
याबाबत NYPD (न्यूयॉर्क पोलीस विभाग) यांनी या एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, आम्ही इराणमध्ये घडत असलेली परिस्थिती बारकाईने पाहत आहोत. अतिरिक्त सतर्कतेच्या दृष्टिकोनातून, न्यूयॉर्क शहरातील धार्मिक, सांस्कृतिक आणि इतर महत्त्वाच्या स्थळांवर आम्ही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. आम्ही आमच्या फेडरल भागीदारांसोबत समन्वय ठेवत आहोत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत."
तर वॉशिंग्टन डीसीतील मेट्रोपोलिटन पोलिस विभागाने देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही इराणमधील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. स्थानिक, राज्य आणि फेडरल यंत्रणांसोबत समन्वय ठेवत आमचे नागरिक, व्यवसाय आणि पर्यटक सुरक्षित राहतील, यासाठी आम्ही सतत गुप्तचर माहितीचे परीक्षण करत आहोत,” असे वॉशिंग्टन डीसीतील मेट्रोपोलिटन पोलिस विभागाने म्हटले आहे. "सध्या वॉशिंग्टन डीसीवर कोणताही धोका नाही. मात्र, शहरातील विविध धार्मिक स्थळांवर आधीपासूनच वाढीव बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. नागरिकांनी सतर्क राहून सहकार्य करावे," असे आवाहन करण्यात आले आहे.
इराणमध्ये नेमके काय घडले?
अमेरिकेने रविवारी पहाटे इराणमधील तीन आण्विक तळांवर हल्ले केले. यामुळे अमेरिका थेट इराण-इस्रायल संघर्षात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधून देशाला संबोधित करत सांगितले की, “इराणची महत्त्वाची आण्विक तळं पूर्णपणे नष्ट करण्यात आली आहेत.” तर इराणने यावर तीव्र प्रतिक्रिया देत अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग केल्याचा आरोप केला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची म्हणाले, अमेरिकेने आमच्या आण्विक तळांवर हल्ला करून UN चार्टर, आंतरराष्ट्रीय कायदे आणि अण्वस्त्र प्रतिबंध कराराचा भंग केला आहे. आमच्यावर झालेला हा हल्ला गंभीर असून आम्हाला आमची स्वतःची सुरक्षा करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा