धाक दाखवून करार करुन घेण्याची तयारी! अणू कराराच्या दुसरी फेरीत काहीच हाती लागलं नाही; अमेरिकेची इराणविरोधात अवघ्या 700 किमी अंतरावर थेट लष्करी जमवाजमव, रशियाही सरसावला
ओमान, कतार आणि सौदी अरेबिया यांसारखे आखाती देश प्रादेशिक युद्ध टाळण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील हा तणाव वाढल्यास त्याचा परिणाम जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर होऊ शकतो.

Iran Vs America Crisis: इराण आणि अमेरिकेतील जिनिव्हा, स्वित्झर्लंडमधील अणू कराराच्या दुसऱ्या फेरीत काहीच हाती लागलेलं नाही. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले की, काही मुद्द्यांवर प्रगती झाली असली तरी, अमेरिका आणि इराण अजूनही अनेक महत्त्वाच्या विषयांवर एकमेकांपासून खूप दूर आहेत. त्यामुळे आता अमेरिकेने इराणला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करार करणे इराणसाठी हिताचे ठरेल, अन्यथा त्यांना लष्करी कारवाईचा सामना करावा लागू शकतो, असा थेट इशारा दिला आहे.
हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी
येत्या मार्चच्या मध्यापर्यंत अमेरिकेचे पूर्ण लष्करी बळ या भागात तैनात असेल. ओमान, कतार आणि सौदी अरेबिया यांसारखे आखाती देश प्रादेशिक युद्ध टाळण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करत आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील हा तणाव वाढल्यास त्याचा परिणाम जागतिक तेलाच्या पुरवठ्यावर होऊ शकतो, कारण इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी दिली आहे.
लष्करी हालचाली आणि अमेरिकेच्या धमक्या
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आखाती प्रदेशात दोन विमानवाहू युद्धनौका (Aircraft Carriers) आणि हजारो सैन्य तैनात केले आहे 'यूएसएस अब्राहम लिंकन' ही युद्धनौका इराणच्या किनारपट्टीपासून 700 किलोमीटर अंतरावर तैनात आहे. जर इराणने करार केला नाही, तर अमेरिका चागोस बेटांवरील हवाई तळाचा वापर करून इराणवर हल्ले करू शकते, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. दुसरीकडे, इस्रायल देखील इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यंत्रणेवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेच्या परवानगीची वाट पाहत असल्याचे वृत्त आहे.
इराणची भूमिका आणि रशियाची साथ
दरम्यान, इराणने ओमानच्या समुद्रात रशियासोबत संयुक्त नौदल सराव करण्याची घोषणा केली आहे, जेणेकरून या प्रदेशातील अमेरिकेची एकतर्फी कारवाई रोखता येईल. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'त (Strait of Hormuz) युद्ध सराव केला आहे. रशियाने इशारा दिला आहे की, अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील आणि यामुळे अणू दुर्घटना घडण्याचा धोका आहे.
वादाचे मुख्य मुद्दे
अमेरिकेच्या मागण्या: इराणने त्यांच्या भूमीवर युरेनियम संवर्धन (Uranium Enrichment) पूर्णपणे थांबवावे आणि चर्चेत त्यांच्या क्षेपणास्त्र साठ्याचाही समावेश करावा.
इराणची भूमिका: इराणचा अणू कार्यक्रम शांततापूर्ण हेतूंसाठी असून, केवळ निर्बंध उठवण्याच्या बदल्यातच ते अणू मर्यादेवर चर्चा करण्यास तयार आहेत. त्यांनी क्षेपणास्त्र कार्यक्रमावर चर्चा करण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ 28 फेब्रुवारीला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेणार असून इराणवर चर्चा करतील.
इतर महत्वाच्या बातम्या
























