Boris Johnson JCB : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या एका फोटोमुळे ब्रिटनमध्ये वाद सुरू झाला आहे. मागील आठवड्यात भारत दौऱ्यावर असताना पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 'जेसीबी'वर फोटो काढला. त्यावरून वाद सुरू झाला असून विरोधकांनी पंतप्रधानांचा राजीनामा मागितला आहे.  


जेसीबी ही ब्रिटनमधील जे. सी. बॅमफोर्ड एक्सकेवेटर या कंपनीच्या मालकीची आहे. बोरिस जॉन्सन यांनी भारत दौऱ्यात या कंपनीच्या कारखान्याला भेट दिली होती. त्यावेळी जॉन्सन यांनी जेसीबीसोबत फोटो काढला. या फोटोविरोधात भारतीय वंशाच्या नाडिया व्हिटोम यांच्यासह मजूर पक्षाच्या खासदारांनी जॉन्सन यांच्यावर टीकेची झोड उठवली. ब्रिटनच्या संसदेतही हा मुद्दा उपस्थित झाला. 


भारतात सध्या जेसीबीचा वापर हा अल्पसंख्याकांना लक्ष्य करून त्यांचे घरं, मालमत्ता तोडण्यासाठी केला जात असल्याचे खासदारांनी म्हटले. बोरिस जॉन्सन यांची फोटो काढण्याची कृती ही त्याला पाठबळ देण्यासारखं असल्याचे विरोधकांनी म्हटले. उत्तर दिल्लीतील जहांगीरपूरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर जेसीबी कंपनीच्या उपकरणांचा वापर करून काही मालमत्ता पाडण्यात आल्याचे खासदारांनी म्हटले. यावेळी विरोधकांनी बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. 


सरकारने काय म्हटले?


ब्रिटन सरकारचे परराष्ट्र आणि राष्ट्रकुल देश आणि विकास खात्याचे राज्य मंत्री विकी फोर्ड यांनी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केलेल्या भारत दौऱ्यामुळे ब्रिटन-भारत या देशांमधील व्यापार संबंधांना अधिक बळ मिळाले आहे. मात्र, ब्रिटन सरकार मानवाधिकारांनाही महत्त्व देत असल्याचे त्यांनी सांगितले. मानवाधिकारांकडे दुर्लक्ष करून व्यापार करता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले. 


वादाच्या भोवऱ्यात जॉन्सन


बोरिस जॉन्सन हे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकतात. मागील काही दिवसांपूर्वी एक वर्षांपूर्वी कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना दंड ठोठावण्यात आला होता. त्याशिवाय इतरही मुद्यावरही वाद निर्माण झाला होता. त्यावेळी विरोधकांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: