दुबई : एखाद्या घोटाळ्यात आरोपी दोषी सिद्ध झाला, तर त्याला किती वर्ष शिक्षा होऊ शकते? जन्मठेप किंवा फार फार तर दुहेरी जन्मठेप. मात्र दुबईतल्या कोर्टाने चिटफंड घोटाळ्यात दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना तब्बल 500 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी भारतीय आहेत.

मूळचे गोव्याचे रहिवासी असलेले सिडने लेमोस आणि रायन डिसुझा दुबईमध्ये स्थायिक झाले. तिथे त्यांनी 'एक्झेंन्शिअल' ही चिटफंड कंपनी सुरु केली. 37 वर्षांच्या सिडनेच्या कंपनीत 25 वर्षीय रायन सिनिअर अकाऊण्ट स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत होता.

किमान 25 हजार डॉलरची गुंतवणूक करुन वार्षिक 120 टक्के परतावा देण्याचा गुंतवणूकदारांना केला जात असे. सुरुवातीला आश्वासन पूर्ण करण्यात आलं, मात्र मार्च 2016 मध्ये कंपनी डबघाईला जाताच दोघांनी रिटर्न्स देणं बंद केलं.

या प्रकरणी 200 मिलिअन डॉलर्सचा (अंदाजे 1300 कोटी रुपये)  घोटाळा करुन अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप सिद्ध झाला. 513 जणांच्या तक्रारीनंतर सिडने आणि रायन यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. दुबईतील कोर्टाने त्यांना पाचशे वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

देश-विदेशातील प्रसिद्ध खेळाडू आणि सिनेस्टार्सबरोबर या दोन्ही आरोपींची उठबस होती. सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, रणबीर कपूरपासून फुटबॉलपटब रोनाल्डिनोपर्यंत अनेकांशी त्यांच्या ओळखी होत्या. त्याचप्रमाणे लेमोस आणि डिसुझा यांची कंपनी मोठमोठ्या समारंभांचे प्रायोजकत्वही स्वीकारत असे.