Sudan Gurung: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चौकशीत असलेल्या वादग्रस्त व्यावसायिक दीपक भट्ट यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये त्यांचे शेअर्स असल्याचा आरोप झाल्यानंतर सुदान गुरुंग (Sudan Gurung) यांनी नेपाळच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या 25 दिवसांत त्यांना राजीनामा द्यावा लागल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आणि फेसबुकद्वारे जनतेला या निर्णयाची माहिती दिली.
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याने चर्चेत
दीपक भट्ट यांची चौकशी गृह मंत्रालयाकडून नव्हे तर अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने कोणत्याही प्रकारचा हितसंबंधांचा संघर्ष (Conflict of interest) उद्भवत नाही, असे ते म्हणाले. 'पदापेक्षा नैतिकता मोठी आहे' आणि आपल्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी या उद्देशाने आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुदान गुरुंग हे देशात झालेल्या जेन-झेड (Gen-Z) आंदोलनानंतर उदयास आलेले नेते असून त्यांनी 27 मार्च 2026 रोजी गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सुरुवातीच्या काळात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे ते चर्चेत आले होते.
सुदान गुरुंग यांच्यावर नेमके आरोप काय?
सुदान गुरुंग यांच्या नावावर स्टार मायक्रो इन्शुरन्स आणि लिबर्टी मायक्रो इन्शुरन्स या दीपक भट्ट यांच्याशी संबंधित कंपन्यांमध्ये प्रत्येकी 2.5 दशलक्ष नेपाळी रुपयांचे शेअर्स असल्याची माहिती रविवारी सार्वजनिक झालेल्या कागदपत्रांमधून समोर आली. हे शेअर्स त्यांनी मालमत्तेच्या तपशीलात स्वतंत्रपणे न दाखवता 27.45 दशलक्ष रुपयांच्या एकूण शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये दाखवले होते.
सुदान गुरुंग यांचे स्पष्टीकरण
त्यांनी हे आरोप फेटाळून लावत याला 'प्रायोजित अफवा' म्हटले आहे आणि भ्रष्ट लोक त्यांच्या कारवाईला घाबरून ही चुकीची माहिती पसरवत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, हे शेअर्स त्यांनी मंत्री होण्यापूर्वीच खरेदी केले होते आणि जेव्हा त्यांची अधिकृत गुंतवणूक 20 दशलक्ष रुपयांपेक्षा जास्त आहे, तेव्हा 2.5 दशलक्ष लपवण्याचे कोणतेही कारण नाही.
इतर महत्वाच्या बातम्या
