Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील आर्थिक संकटावेळी देश सोडून पळालेले माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे (Sri Lanka Ex President Gotabaya Rajapaksha) आता श्रीलंकेमध्ये परतले आहेत. कोलंबो विमानतळावर गोटाबाया राजपक्षे परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. गोटाबाया राजपक्षे सात आठवड्यानंतर श्रीलंकेत परतले आहेत. श्रीलंका (Sri Lanka) इतिहासातील सर्वात भीषण आर्थिक संकटाचा (Financial Crisis) सामना करत आहे. खाद्यपदार्थांपासून ते अगदी इंधनापर्यंत सर्वच गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला असून जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. सध्या राजपक्षे थायलँडमध्ये (Thailand) वास्तव्यास होते. आर्थिक संकटावेळी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी देश सोडला होता.


गोटाबाया यांच्या परतीची तयारी


राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रीलंकेच्या संसदेने रानिल विक्रमसिंघे यांची नवे राष्ट्रपती म्हणून म्हणून नियुक्ती केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रमसिंघे यांनी राजपक्षे यांच्या परतण्याची व्यवस्था केली आहे. राजपक्षे कुटुंबीयांच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या पोदुजाना पेरामुना यांनी गोटाबायाच्या परतीची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता गोटाबाया राजपक्षे मायदेशी परतले आहेत.


थायलंड आधी सिंगापूर आणि मालदीवमध्ये मुक्काम


श्रीलंकेतून पलायन करत राजपक्षे यांनी आधी मालदीव आणि सिंगापूरमध्ये (Singapore) आश्रय घेतला होता. गोटाबाया राजपक्षे श्रीलंका सोडून मालदीवला गेले. तेथे एक दिवस मुक्काम केल्यानंतर ते  सिंगापूरला पोहोचले. मात्र राजपक्षे यांना कायदेशीर कारणांमुळे सिंगापूरही सोडावं लागलं. राजपक्षे यांचा सिंगापूर येथे राहण्यासाठीचा व्हिसा संपल्यामुळे त्यांनी सिंगापूर सोडून थायलँडमध्ये (Thailand) आश्रय घेतला होता. त्यानंतर ते आता श्रीलंकेत परतले आहेत. 


श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती बिकट, उपासमारीची वेळ


श्रीलंका इतिहासातील सर्वात मोठ्या आणि भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सध्या श्रीलंकेतील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र आहे. देशात इंधनासह खाद्यपदार्थांचाही तुटवडा (Food Crisis) निर्माण झाला आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंची मोठी कमतरता जाणवत आहे. श्रीलंकेमध्ये सध्या उपासमारीची वेळ आली आहे. अन्नापासून ते स्वयंपाकाचा गॅस, औषध सारख्या जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा निर्माण झाला आहे.


12 जुलैला सोडला होता देश


श्रीलंकेमध्ये भीषण आर्थिक संकट निर्माण झाल्याने जनतेनं जागोजागी निदर्शनं करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर देशातील नागरिकांचा प्रचंड संताप पाहायला मिळाला. यावेळी जनता रस्त्यावर उतरली होती. तसेच त्रस्त नागरिकांनी राष्ट्रपती भवनावरही मोर्चा नेला होता. जनतेकडून गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. या दरम्यान 12 जुलै 2022 रोजी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडत पलायन केले होते.