Chinese Spy Balloon : अमेरिकेने चीनचा स्पाय बलून (Spy Balloon) फोडल्यानंतर फुग्याच्या अवशेषांमधून चीनचा मोठा कट उघड झाला आहे. चीनचा हा स्पाय बलून कम्युनिकेशन सिग्नल गोळा करण्यात सक्षम असल्याचे अमेरिकेने म्हटलं आहे. चीनने अमेरिकेप्रमाणे 40 देशांमध्ये असे स्पाय बलून सोडल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेमध्ये आकाशात फुगा उडताना दिसला. हा चीनचा स्पाय बलून असल्याचं अमेरिकेने सांगितलं होतं. दरम्यान, अमेरिकेने चीनचा स्पाय बलून फोडला त्यानंतर त्याच्या मिळालेल्या अवशेषांमधून अमेरिकेच्या हाती चीनविरोधात नवीन माहिती समोर आली आहे.


अमेरिकेने फोडला चीनचा फुगा


अमेरिकेने सांगितलं आहे की, चीनचा स्पाय बलूनमध्ये कम्युनिकेशन सिग्नल गोळा करण्यासाठी सक्षम तंत्रज्ञान होतं. अमेरिकेने आकाशात उडणारा चिनी स्पाय बलून 5 फेब्रुवारी रोजी फोडला होता. अमेरिकेने लढाऊ विमानाच्या मदतीने क्षेपणास्त्र मारा करत हा स्पाय बलून फोडला होता. त्यानंतर बुधवारी (8 फेब्रुवारी) अमेरिकन नौदलाला या स्पाय बलूनचे अवशेष अटलांटिक महासागरात सापडले. या अवशेषांवरुन अमेरिका या स्पाय बलूनसंदर्भात पुढील तपास करत आहे.


'स्पाय बलूनच्या मदतीने चीनची हेरगिरी'


अमेरिकेच्या आकाशात स्पाय बलून दिसल्या अमेरिकनं लष्कर पेंटागॉनने दावा केला होता की, चीन या स्पाय बलूनच्या मदतीने हेरगिरी करत आहे. यावर चीनने स्पष्टीकरण देत सांगितले होते की, "हा फुगा फक्त हवामानाची माहिती गोळा करण्यासाठी आहे." त्यानंतर अमेरिकेने चिनी स्पाय बलून फोडला. यानंतर चीनचा तिळपापड झाला आणि चीननं अमेरिकेला धमकी वजा इशाराही दिला होता.


40 पेक्षा जास्त देशांमध्ये चीनचा स्पाय बलून


यूएस स्टेट डिपार्टमेंटने म्हटलं आहे की, "आम्हाला माहित आहे की पीआरसीने (पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना) हे पाळत ठेवणारे फुगे म्हणजेच स्पाय बलून पाच खंडातील 40 पेक्षा जास्त देशांमध्ये पाठवले आहेत. बायडेन प्रशासन त्या 40 देशांशी थेट संपर्क साधून त्यांना सतर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत."


'स्पाय बलूनचं नियंत्रण चिनी लष्कराच्या हाती'


अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी सांगितलं आहे की, "पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (PLA) म्हणजेच चिनी लष्कराच्या हाती या स्पाय बलूनचं नियंत्रण आहे. चिनी लष्कराच्या सूचनेनुसार अनेकदा अशा कारवाया केल्या जातात. या उपक्रमाचे संपूर्ण नियंत्रण पीएलएच्या हातात आहे. अमेरिका मित्र राष्ट्रांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या चीनवर पाळत ठेवून त्याचं पितळ उघड पाडत राहिल."


चीनने अमेरिकेचे आरोप फेटाळले


चीनने हा फुगा आपलाच असल्याचे मान्य केलं आहे, पण हा फुगा हेरगिरीसाठी वापरण्यात येत असल्याचं नाकारलं आहे. चीनने सांगितलं की, "हा फुगा हवामानाची माहिती गोळा करण्यासाठी होता आणि त्याचा मार्ग चुकला होता." अमेरिकेने चीनचा फुगा फोडून आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचा उलट आरोप चीनने केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :  


Spy Balloon : चीनकडून हेरगिरीसाठी वापरण्यात येणारा 'स्पाय बलून' म्हणजे नक्की काय? वर्ल्ड वॉरमध्येही वापर, 'ही' आहे खासियत