Solar Flare Impact : अमेरिकनं अंतराळ संस्था नासाने (NASA) सूर्यावरील स्फोटाचा फोटो शेअर केला आहे. रविवारी (2 ऑक्टोबर) सूर्यावर सौरज्वालांमुळे मोठा स्फोट झाला. नासा संस्थेने हा क्षण टिपला आणि त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासाने (NASA) सांगितलं की 2 ऑक्टोबर रोजी सूर्यावर मोठं सौरवादळ उत्पन्न झालं. यामुळे मोठ्या प्रमाणात सौर ज्वाळा म्हणजे सोलर फ्लेयर (Solar Flare) तयार झाल्या. नासाच्या सोलर डायनॅमिक वेधशाळेच्या साहाय्याने या घटनेचा फोटो टिपण्यात यश मिळालं.
सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही नासाने आपल्या सोलर डायनॅमिक्स वेधशाळेचा वापर करून सौरवादळाची फोटो टिपला होता. त्याच महिन्यात, CESSI जे सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सने या भारतीय संस्थेने सूर्याच्या पृष्ठभागावर भविष्यात होणाऱ्या उद्रेकाबाबत शक्यता असल्याचं सांगितलं होतं.
पृथ्वीला धोका?
येत्या काही दिवसांत सूर्यावर असे अनेक स्फोट होऊ शकतात, अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. याचं कारण म्हणजे सूर्याचा एक भाग पृथ्वीच्या दिशेने आहे आणि सूर्याच्या या भागात स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पृथ्वीसाठी धोक्याची शक्यता आणखी वाढली आहे.
सौर स्फोट किंवा सौरवादळ म्हणजे काय?
सौर स्फोट किंवा सौरवादळ म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या ज्वाळा तयार होतात. सूर्यावरील चुंबकत्वामुळे तापमान वाढून हे स्फोट होतात. याचं रुपांतर नंतर सौर वादळात होतं. सूर्यावर होणारे स्फोट अणुबॉम्बइतके शक्तिशाली असू शकतात, यावरून तुम्ही या धोकादायकचा अंदाज लावू शकता. जेव्हा सूर्यावरील वायूंच्या घर्षण होऊन स्फोट होतात, तेव्हा त्यातून ज्वाला बाहेर पडतात, याला सौर ज्वाळा म्हणतात. या ज्वाळानंतर ते पृथ्वीच्या तसेच सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या दिशेने फेकल्या जातात.
सौरवादळाचा पृथ्वीवर काय परिणाम होईल?
सौरज्वाळा पृथ्वीच्या दिशेने आल्यास याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होईल. या सौरज्वाळामुळे ज्वालामुखी आणि रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स, GPSवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.