America Donald Trump : अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असताना ही घटना घडली आहे. काल (शनिवारी रात्री 26 एप्रिल, 2026) मोठ्या गोळीबाराचे आवाज ऐकू आल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि मेलानिया ट्रम्प (Melania Trump) यांनी व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले अधिक तपास केला जात आहे. मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली. (Donald Trump News) या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ल्याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी त्यांनी सुरक्षा दलांच्या तत्परतेचे कौतुक केले.

ट्रम्प यांनी म्हटलं की "हे सर्व अत्यंत अनपेक्षित होते, परंतु 'सीक्रेट सर्व्हिस' आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांनी (Law Enforcement) यावर अतिशय वेगाने कारवाई केली. अनेक शस्त्रास्त्र असलेल्या एका व्यक्तीने सुरक्षा चौकीवर हल्ला केला, ज्याला सीक्रेट सर्व्हिसच्या काही शूर सदस्यांनी त्याला पकडले. त्यांनी अतिशय तत्परतेने पाऊल उचलले."

" या घटनेची पारदर्शकता आणि स्पष्टता राहावी यासाठी, मी आत्ताच या घटनेचा व्हिडिओ जारी करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडिओमध्ये त्या गुंडाने केलेली हिंसा दिसून येते, ज्याने आपल्या संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच सीक्रेट सर्व्हिस आणि सुरक्षा दलांनी आपल्या देशासाठी किती वेगाने कारवाई केली, हे देखील यातून स्पष्ट होते."

"या घटनेत एका अधिकाऱ्याला गोळी लागली, परंतु त्याने उच्च दर्जाचे बुलेटप्रूफ जॅकेट (Vest) घातल्यामुळे त्याचा जीव वाचला. अतिशय जवळून एका बंदुकीने त्याला गोळी मारण्यात आली होती, मात्र जॅकेटने त्याचे रक्षण केले. तो आता धोक्याबाहेर असून त्याची प्रकृती उत्तम आहे. त्याचे मनोबल खूप चांगले आहे. आम्ही त्याला सांगितले आहे की, आमचे त्याच्यावर प्रेम आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान वाटतो."

Donald Trump on firing: नेमकं काय घडलं?

शनिवारी रात्री व्हाईट हाऊस वार्ताहरांच्या वार्षिक स्नेहभोजन सोहळ्याबाहेर गोळीबाराची घटना घडली . राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असून अमेरिकेच्या इतर वरिष्ठ नेत्यांना बॉलरूममधून बाहेर काढण्यात आले.सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला. एका अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितल्याप्रमाणे एका सुरक्षा  अधिकाऱ्याला गोळी लागली, मात्र बुलेटप्रूफ जाकीट परिधान केलेले असल्याने ते सुखरुप असण्याची अपेक्षा आहे.एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार  एक संशयित ताब्यात घेण्यात आला आहे.सीक्रेट सर्व्हिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांनी वॉशिंग्टन हिल्टन येथील सभागृहात धाव घेतली. शेकडो उपस्थितांनी टेबलाखाली आसरा घेतला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, पत्नी मेलानिया ट्रम्प आणि इतर वरिष्ठ नेत्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या घटनेच्या काही व्हिडिओंमध्ये मोठे आवाज ऐकू आल्याचा दावा करण्यात आला होता, किंबहुना या व्हिडिओंची सत्यता अद्याप पडताळली गेलेली नाही. एका वृत्तानुसार, या आवाजानंतर उपस्थितांना बाहेर काढण्यात आले आणि परिसर सील करण्यात आला आहे.