Facebook COO Sheryl Sandberg Resign : फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटाच्या (Meta) सीओओ (COO) शेरिल सँडबर्ग (Sheryl Sandberg) यांनी राजीनामा दिला आहे. फेसबुककडून अधिकृतपणे देण्यात आलेल्या माहितीनुसार, शेरिल सँडबर्ग यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, शेरिल सँडबर्ग यांनी आपल्या पदाचा राजीनामा का दिला? याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही. त्यांनी एक पोस्ट शेअर करत राजीनाम्यानंतर त्यांचं पुढचं पाऊल काय असणार, याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 



सोशल मीडिया पोस्टमध्ये शेरिल म्हणाल्या... 


फेसबुकच्या सीओओ शेरिल सँडबर्ग यांनी त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सांगितलंय की, त्या आता समाजाच्या हितासाठी काम करणार आहे. इतकंच नाही तर सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मचा संदर्भ देत शेरिल म्हणाल्या की, सोशल मीडियामध्ये आता पूर्वीच्या तुलनेत खूप बदल झाले आहेत. आपण कोणतंही उत्पादन बनवतो, त्यांचा लोकांवर मोठा प्रभाव पडतो. त्यामुळे लोकांच्या गोपनीयतेचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी असते. शेरिल गेल्या 14 वर्षांपासून मेटा कंपनीच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर म्हणून कार्यरत होत्या. त्या म्हणाली की, 2008 मध्ये जेव्हा मी कंपनीत रुजू झाले होते, त्यावेळी मला वाटलं होतं की, पुढची पाच एक वर्ष इथे राहीन, पण बघता बघता तब्बल 14 वर्ष उलटून गेली. आता आयुष्याचा नवा अध्याय लिहिण्याची वेळ आली आहे.



कंपनीचे सीईओ म्हणाले... 


दरम्यान, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी आपल्या एका पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, शेरिल सँडबर्ग फेसबुकसोबत कायम राहतील. त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे की, शेरिल सँडबर्ग फेसबुकच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा हिस्सा असतील. त्यासोबतच झुकरबर्ग यांनी सांगितलं की, फेसबुकचा नवा सीओओ कोण असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. जेवियर ओलिवन यांना फेसबुकचं नवं सीओओ बनवण्यात आलं आहे.