शांघाई : 'वस्तू तुटली तर संपूर्ण पैसे द्यावे लागणार' ही दुकानातील पाटी तुम्ही पाहिली असेल ना? चीनमध्ये खरेदीसाठी आलेली एक महिला ग्राहक अशाच घटनेला सामोरी गेली. त्यानंतर जे झालं, ते वाचून तुम्हीसुद्धा अवाक व्हाल.
चीनच्या युआन प्रांतात एक महिला ब्रेसलेट पाहण्यासाठी गेली होती. जेड ब्रेसलेट घालून पाहत असताना तिच्या हातातून चुकून ते निसटलं आणि खाली पडलं. अत्यंत नाजूक असल्यामुळे ब्रेसलेट पडताक्षणी तुटलं.
त्या ब्रेसलेटची मूळ किंमत 3 लाख युआन (44 हजार 110 डॉलर म्हणजे अंदाजे 28 लाख रुपये) असल्याचं तिला सांगण्यात आलं. ही किंमत ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली.
शेजारी उभ्या असलेल्या ग्राहकांनी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचे ओठ हळूहळू निस्तेज व्हायला लागले आणि पाहता पाहता ती बेशुद्ध पडली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
धक्क्यामुळे ती महिला बेशुद्ध पडली होती. मात्र तिला वेळीच उपचार मिळाल्यामुळे तिची प्रकृती सुधारली आहे, असं दुकानाच्या मालकाने सांगितलं. स्थानिक मीडियानुसार महिलेची आर्थिक परिस्थिती पाहून किमतीवर घासाघीस करण्यात आली. अखेर सात लाख रुपयांवर हा सौदा पटल्याची माहिती आहे.