नवी दिल्ली : भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला उत्तर दिलं होतं. यानंतर पाकिस्तानचा दहशतवादासंदर्भातील खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी जगभरातील विविध देशात खासदारांचं शिष्टमंडळ पाठवलं होतं. काँग्रेस खासदार शशी थरुर हे 7 पैकी एका शिष्टमंडळाचं नेतृत्त्व करत होते. शशी थरुर ब्राझीलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना माध्यमांकडून काँग्रेस नेत्यांकडून होत असलेल्या त्यांच्या टीकेसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की आता वेळ आलीय की आम्ही आमच्या मिशनवर लक्ष केंद्रीत करावं.
काँग्रेस नेत्यांसदर्भात मीडियानं प्रश्न विचारले असता शशी थरुर यांनी एका समृद्ध लोकशाहीत टीका आणि आलोचना होणं शक्यआहे. मला वाटतं की सध्या आम्ही त्या गोष्टींवर लक्ष देऊ शकत नाही.
भारतात आल्यानंतर टीकाकार आणि सहकारी नेत्यांसोबत चर्चा करणार
भारतात जेव्हा परत येईन तेव्हा आपल्याला नक्कीच सहकारी, टीकाकार आणि माध्यमकर्मींसोबत चर्चा करण्यााची संधी मिळेल. सध्या आम्ही आम्हाला ज्या देशात जायचं आहे त्याच्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. जिथं आम्ही जातोय तिथं तिथल्या लोकांसमोर संदेश पोहोचवत आहोत. शशी थरुर विदेशात भारताची बाजू सक्षमपणे मांडत आहेत, पाकिस्तानचा दहशतवादासंदर्भातील खरा चेहरा जगासमोर मांडत आहेत. शशी थरुर ज्या प्रभावीपणे भारताची बाजू मांडत आहेत त्यानुसार एकेकाळचे त्यांचे टीकाकार आता चाहते बनले आहेत.
शस्त्रसंधीसंदर्भात काँग्रेसकडून सवाल
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसनं मोदी सरकारला समर्थन दिलं होतं. काँग्रेसनं पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूरनंतर संसदेच्या विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्याची मागणी केली होती. सरकारनं ती मागणी मान्य केली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहावं, अशी मागणी देखील काँग्रेसची होती. सरकारनं ती देखील मागणी मान्य केलं नाही. काँग्रेसकडून शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्न विचारले आहेत. काँग्रेसनं सुचवलेली चार खासदारांची नावं देखील स्वीकारली गेली नव्हती. केंद्रानं शशी थरुर यांच्याकडे एका शिष्टमंडळाचं नेतृत्त्व सोपवण्यात आलं.
