Bangladesh Violence : बांगलादेशच्या माजी कर्णधाराच्या घरावर बॉम्ब हल्ला, घर पेटवण्याचा प्रयत्न; हल्ल्यामागे शेख हसिनांचे दिल्ली कनेक्शन
Shakib Al Hasan Magura House Attack : शेख हसीना यांच्या दिल्लीतील व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत उपस्थित राहिल्यानंतर अवघ्या काही तासांत शाकिब अल हसनच्या मागुरा येथील घरावर हल्ला आणि तोडफोड करण्यात आली.

नवी दिल्ली : बांगलादेशचा माजी क्रिकेट कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्या मागुरा शहरातील घरावर अज्ञातांकडून पेट्रोल बॉम्बचा हल्ला करण्यात आला. त्याचे घर पेटवण्याचा प्रयत्नही यावेळी झाला. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी नवी दिल्लीतून घेतलेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत शाकिब अल हसन उपस्थित राहिला होता. त्यानंतर अवघ्या काही तासांतच हा हल्ला घडवून आणण्यात आला आहे.
स्थानिक वेळेनुसार, बुधवारी रात्री सुमारे 8 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास मागुरा शहरातील केशबमोड भागातील घरावर हा हल्ला झाला. यावेळी आंदोलकांनी घराची मोठी तोडफोडही केली.
Sheikh Hasina Press Conference : शेख हसीनांच्या पत्रकार परिषदेत शाकिबची उपस्थिती
नवी दिल्लीतील 'फॉरेन कॉरस्पॉन्डेंट्स क्लब'मध्ये बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. शाकिब अल हसन देखील या पत्रकार परिषदेत ऑनलाईन सहभागी झाला होता. याचाच राग धरून अवामी लीगविरोधी घटकांनी शाकिबच्या घरावर हल्ला केल्याचे बोलले जात आहे. या घटनेचा निषेध करत अवामी लीगने (Awami League) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "पत्रकार परिषदेत सहभागी होण्याची किंमत घरे जाळून चुकवावी लागत आहे. बांगलादेशात नव-फासीवाद पसरत असून अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे."
Sheikh Hasina Emotional Statement : शेख हसीना भावुक
5 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीतून मीडियाशी बोलताना 78 वर्षीय शेख हसीना अत्यंत भावुक झाल्या आणि कुटुंबातील मृत सदस्यांची आठवण काढून त्यांना अश्रू अनावर झाले. "आज मी केवळ एक माजी पंतप्रधान म्हणून नाही, तर राष्ट्रपिता बंगबंधू यांची मुलगी म्हणून बोलत आहे. लाखो लोकांनी ज्यासाठी बलिदान दिले तो हा बांगलादेश नाही. गेल्या काही वर्षांत काही संघटनांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा वापर हिंसाचार आणि सत्तापालटासाठी केला," असा आरोप त्यांनी केला.
या वेळी शेख हसीना यांनी स्पष्ट केले की त्या चालू वर्षाच्या डिसेंबर महिन्यात बांगलादेशात परतण्यासाठी कटिबद्ध आहेत. "माझे पुनरागमन सत्तेसाठी नाही, तर बांगलादेशला विकास, धर्मनिरपेक्षता आणि समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी आहे. मला तुरुगात धाडले तरी किंवा माझी हत्या केली तरी मी माझ्या जनतेसाठी नक्की परतणार," असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
Bangladesh Crisis : अवामी लीग नेत्यांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरूच
बांगलादेशातील राजकीय उलथापालथीनंतर अवामी लीगशी संबंधित नेते आणि माजी खासदारांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे. शाकिब अल हसन याच्या घरावर झालेल्या या हल्ल्यामुळे बांगलादेशातील अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर बनला आहे.
ही बातमी वाचा:






















