लंडन : ब्रिटनचे नवे पंतप्रधान भारतीय वंशाच्या ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी लिझ ट्रस यांच्या जुन्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे. ब्रिटनच्या किंग चार्ल्स (King Charles II) यांची भेट घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी हे यांनी हे पाऊल उचललं आहे. ब्रिटनच्या लोकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी ऋषी सुनक यांनी लागोलाग काम सुरू केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते नव्या लोकांची मंत्रिपदावर वर्णी लावणार आहेत. 


ऋषी सुनक यांनी ज्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला सांगितलं आहे त्यामध्ये व्यापार सचिव जेकब रीज-मॉग, न्याय खात्याचे सचिव ब्रॅन्डन लिवाइज आणि विकास मंत्री विकी फोर्ड यांच्या नावाचा समावेश आहे. जुन्या मंत्रिमंडळातील जेरेमी हंट (Jeremy Hunt) हे मात्र ऋषी सुनक यांच्या मंत्रिमंडळात कायम राहणार असून त्यांची अर्थमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


 






पंतप्रधानपदी नाव सुनिश्चित झाल्यानंतर ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या लोकांना संबोधित केलं. त्यामध्ये आर्थिक स्थिरता हाच आपल्या सरकारचा उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 


ऋषी सुनक यांनी आज लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमध्ये किंग चार्ल्स यांची भेट घेतली. किंग चार्ल्स यांनी त्यांना देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्त केले आणि त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री सुनक हे भारतीय वंशाचे असून ते ब्रिटनच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत.


कोण आहेत ऋषी सुनक? 


ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे असून फाळणीपूर्वी त्यांच कुटुंब सध्याच्या पाकिस्तानमधील गुजरांवाला या गावी राहत होतं. फाळणीदरम्यान झालेल्या दंगलीमध्ये सुनक कुटुंबीयांनी पाकिस्तान सोडून दिल्लीत आश्रय घेतला. त्यानंतर ते ब्रिटनला गेले. ऋषी सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी साउथम्प्टन( इंग्लंड ) येथे झाला. ऋषी सुनक हे 42 वर्षांचे असून त्यांनी प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्तीसोबत लग्न केले आहे. 


ऋषी सुनक हे ब्रिटनच्या संसदेत पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. ब्रिटनचे ते सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत आणि त्यांची संपत्ती 7300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सुनक यांनी ऑक्सफर्डमधील राजकारण आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमएचं शिक्षण घेतलं आहे.