नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचे अभिनंदन केले. इस्रायल आणि हमास यांच्यात गुरुवारी (9 ऑक्टोबर 2025) शस्त्रसंधी आणि पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात इस्रायली ओलिसांना सोडवण्यासाठी एक करार झाला. हा ट्रम्प यांच्या गाझात शांतता असण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

Narendra Modi Call To Donald Trump : पंतप्रधान मोदींकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट करत म्हटले की, " माझे मित्र, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोललो आणि ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. व्यापार करारात झालेल्या चांगल्या प्रगतीचाही आढावा घेतला. येत्या काही आठवड्यात संपर्क साधण्यावर सहमती झाली."

इस्रायल-हमासमध्ये करार

इजिप्तमध्ये दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धाचा शेवट करण्याच्या दिशेने उचललेले हे सर्वात मोठे पाऊल आहे. या करारानुसार, गाझामध्ये युद्धबंदी लागू होईल. इस्रायल गाझातून अंशतः माघार घेईल आणि हमासने पकडलेल्या ओलिसांना सोडले जाईल, त्या बदल्यात इस्रायल आपल्या ताब्यात असलेले पॅलेस्टिनी कैदी सोडणार आहे.

दहशतवादाचे कोणतेही रुप मान्य नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी

गाझा शांतता करारावर पंतप्रधान मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट केले की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेअंतर्गत झालेल्या प्रगतीबद्दल अभिनंदन करण्यासाठी मित्र पंतप्रधान नेतन्याहू यांना फोन केला. आम्ही ओलिसांची सुटका आणि गाझातील लोकांपर्यंत मानवीय मदत वाढवण्याच्या कराराचे स्वागत करतो. जगात कुठेही कोणत्याही स्वरूपात दहशतवाद अस्वीकार्य आहे."

गाझा आरोग्य मंत्रालयाने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 7 ऑक्टोबर 2023 पासून गाझावर झालेल्या इस्रायली हल्ल्यात 67,139 पॅलेस्टिनी मारले गेले आणि 1,69,583 जण जखमी झाले आहेत. मारले गेलेले बहुतेक लोक सामान्य नागरिक आहेत, ज्यात अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे.

जेनेरिक औषधांवर ट्रम्प यांच्याकडून सवलत

भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर अद्याप अंतिम सहमती झालेली नाही. याबाबत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये सतत चर्चा सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेने जेनेरिक औषधांच्या आयातीवर शुल्क लावण्याची योजना (Trump Tariff on Generic Drug) सध्या स्थगित केली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतीय औषध कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारतीय औषध कंपन्या अमेरिकेत जेनेरिक औषधांचे सुमारे 50 टक्के उत्पादन करतात.