Shehbaz Sharif on Donald Trump: वॉशिंग्टन डीसी येथे 'व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स असोसिएशन'च्या डिनर कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या उपस्थितीत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने जगभरात खळबळ उडाली आहे. या भयावह घटनेवर पाकिस्तानचे (Pakistan) पंतप्रधान शहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

Continues below advertisement

Shehbaz Sharif on Donald Trump: पंतप्रधान शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत शहबाज शरीफ यांनी म्हटले की, "वॉशिंग्टन डीसीमध्ये काही वेळापूर्वी घडलेल्या गोळीबाराच्या भयावह घटनेने मी अत्यंत स्तब्ध झालो आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया आणि तेथे उपस्थित असलेले इतर सर्व लोक सुरक्षित आहेत, ही माहिती मिळणे मोठे दिलासादायक आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्यासोबत असून मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो."

Donald Trump: कार्यक्रमात उडाली होती मोठी अफरा-तफर

दरम्यान, शनिवारी संध्याकाळी जेव्हा हा गोळीबार झाला, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प हे व्यासपीठावरच उपस्थित होते. गोळीबाराचा आवाज ऐकू येताच कार्यक्रमाच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी जिवाच्या आकांताने टेबलखाली आश्रय घेतला. घटनेचे गांभीर्य ओळखून सीक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी तात्काळ ट्रम्प दाम्पत्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.

Donald Trump: संशयित हल्लेखोर ताब्यात

अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने या घटनेची पुष्टी केली असून एक संशयित हल्लेखोर त्यांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, सुरक्षेमध्ये त्रुटी कशी राहिली, या दिशेनेही तपास केला जात आहे. सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून, त्यामध्ये लोक घाबरलेले आणि ओरडताना दिसत आहेत.

PM Narendra Modi on Donald Trump: काय म्हणाले पंतप्रधान मोदी? 

या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प (Melania Trump) आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे," असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Donald Trump : एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल 9 वेळा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती हल्ला; कानाला गोळी लागती तर कधी विषारी रसायन पाठवून....; प्रत्येक वेळी निघाले सुखरूप