Shehbaz Sharif On Pakistan Economy : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी पुन्हा एकदा त्यांच्या देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेबद्दल (Pakistan Economy) दु:ख व्यक्त केले आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी कबूल केले की आता पाकिस्तानचे जवळचे मित्रही देशाला आर्थिक मदत देण्यापासून मागे हटत आहेत. भारतासोबत अलिकडेच झालेल्या लष्करी संघर्षानंतर सैनिकांचे मनोबल वाढवताना त्यांनी केलेलं हे विधान समोर आलं आहे.
मित्र देश भिक्षेची नाही तर व्यवसायाची अपेक्षा करतात: शाहबाज शरीफ
यावेळी बोलताना शाहबाज शरीफ म्हणाले की, "चीन हा पाकिस्तानचा सर्वात जुना मित्र आहे. सौदी अरेबिया, तुर्की, कतार आणि युएई हे आमचे सर्वात विश्वासू मित्र आहेत, परंतु आता हे देश अपेक्षा करतात की आपण त्यांच्यासोबत व्यापार, नवोपक्रम, शिक्षण, आरोग्य आणि गुंतवणूक यासारख्या क्षेत्रात भागीदारी करावी आणि केवळ त्यांच्याकडे मदत मागू नये." त्यांनी असेही म्हटले की, आता हे देश पाकिस्तानकडून एकतर्फी मदतीची नव्हे, तर परस्पर फायदेशीर करारांची अपेक्षा करतात.
मी हा भार उचलणारा शेवटचा व्यक्ती आहे: शाहबाज शरीफ
पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांचा उल्लेख करताना शाहबाज शरीफ म्हणाले, “मी आणि फील्ड मार्शल असीम मुनीर हे आर्थिक भार उचलणारे शेवटचे लोक आहोत. आता हे ओझे संपूर्ण राष्ट्राच्या खांद्यावर आहे." या विधानाद्वारे त्यांनी सूचित केले की आता केवळ सरकार किंवा लष्करालाच नाही तर संपूर्ण राष्ट्राला आर्थिक सुधारणांची जबाबदारी घ्यावी लागेल.
शाहबाज शरीफ यांच्या कबुलीचं सत्र सुरूच!
शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या आर्थिक दुर्दशेची कबुली देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी म्हटले होते की पंतप्रधान असूनही, त्यांना "भिक्षेचा कटोरा" घेऊन जगभर फिरायचे नव्हते. पाकिस्तानला अलिकडेच IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) कडून आर्थिक मदत मिळाली आहे, परंतु देशाची बिकट आर्थिक परिस्थिती स्थिर करण्यासाठी ती पुरेशी मानली जात नाही.
भारताने दहशतवाद्यांचे कंबरडं मोडलं, अनेक अड्डे उद्ध्वस्त
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे, याची पुष्टी शाहबाज शरीफ यांनी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी एका समारंभात त्यांनी कबूल केले होते की भारतीय क्षेपणास्त्रांनी रावळपिंडी आणि इतर ठिकाणी नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता. दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पीओके आणि पाकिस्तानच्या इतर भागात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आणि 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला.
हे ही वाचा