Pakistan News: पाकिस्तानमध्ये आश्रयाला असलेल्या भारतविरोधी दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांमध्ये सध्या मोठी दहशत पसरली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या 'टार्गेट किलिंग'च्या सत्रात आता जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-E-Mohammed) टॉप कमांडर मौलाना सलमान अजहर (Salman Azhar) याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बहावलपूर येथे एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Pakistan News: नेमकी घटना काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याचा अत्यंत जवळचा मानला जाणारा सलमान अजहर बहावलपूरमध्ये असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सलमान अजहरचा जागीच मृत्यू झाला. पाकिस्तानमधील स्थानिक सूत्रांनुसार, त्याचा दफनविधी बहावलपूरमधील 'मर्कज सुभानअल्लाह' येथे पार पडणार आहे. अधिकृतपणे याला अपघात म्हटले जात असले तरी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी या घटनेला 'टारगेट किलिंग' म्हटले आहे.
Pakistan News: दोन दिवसांत दोन मोठे धक्के
पाकिस्तानमध्ये केवळ 48 तासांत दोन मोठ्या दहशतवादी नेत्यांचा खात्मा झाला आहे. 27 एप्रिल रोजी लष्कर-ए-तय्यबाचा खैबर पख्तूनख्वा शाखेचा प्रमुख शेख युसूफ आफ्रिदी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यानंतर हल्लेखोर डोंगराळ भागात पसार झाले. आफ्रिदीच्या हत्येनंतर लगेचच जैशचा टॉप कमांडर सलमान अजहर याचा मृत्यू झाला आहे.
Pakistan News: जैश-ए-मोहम्मदच्या मोहिमांमध्ये सलमान अजहरची महत्त्वाची भूमिका
सलमान अजहर हा जैश-ए-मोहम्मदच्या महत्त्वाच्या मोहिमा आणि रणनीती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असे. एकापाठोपाठ एक टॉप कमांडर्सचा खात्मा होत असल्याने जैश आणि लष्कर-ए-तय्यबा यांसारख्या संघटनांचे कंबरडे मोडले आहे. 'अज्ञात हल्लेखोरांच्या' या कारवायांमुळे पाकिस्तानात लपून बसलेल्या इतर दहशतवाद्यांचे धाबे दणाणल्याचे पाहायला मिळत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
