नवी  दिल्ली : पाकिस्तानचे विदेश मंत्री इशाक दार यांनी भारताबद्दल मोठं वक्तव्य करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर पाडलं आहे. भारतानं दोन्ही देशांच्या प्रश्नांवर कधीच तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मान्य केला नाही, असं इशाक दार यांनी म्हटलं.  यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवण्याबाबत केलेला दावा खोटा ठरलाय.

इशाक दार यांना अमेरिकेचे सचिव  मार्को रुबिओ यांच्याकडून भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थीची तयारी दर्शवल्याबद्दल विचारण्यात आलं. त्यावर इशाक दार यांनी भारतानं पाकिस्तान संदर्भातील प्रश्न हे कायम द्वीपक्षीय ठेवले आहेत.

आम्हाला या प्रश्नांमध्ये त्रयस्थ पक्षाच्या हस्तक्षेपाबाबत आक्षेप असण्याचं कारण नाही मात्र भारतानं कायम हा विषय द्वीपक्षीय ठेवल्याचं इशाक दार म्हणाले. द्वीपक्षीय चर्चेला आमचा आक्षेप नाही मात्र दहशतवाद, व्यापार, अर्थशास्त्र, जम्मू  काश्मीर आणि सर्व विषयांवर सर्वसमावेशक चर्चा व्हावी, असं दार म्हणाले. 

मे महिन्यात अमेरिकेकडून शस्त्रसंधीसंदर्भात प्रस्ताव देण्यात आला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चा त्रयस्थ ठिकाणी घ्यावी असा प्रस्ताव दिला होता. वॉशिंग्टन मधील जुलै 2025 मध्ये असा प्रस्ताव दिला गेला होता, मात्र भारतानं या प्रस्तावाला नकार दिला असं दार यांनी म्हटलं. 

भारतानं नेहमी या द्वीपक्षीय विषय आहे, अशी भूमिका घेतली आहे. आम्ही कशाची भीक मागत नाही आहोत, आमचा देश शांतताप्रिय आहे. आम्ही संवादावर विश्वास ठेवतो, पुढं जाण्यासाठी संवाद गरजेचा आहे, असं दार म्हणाले. भारतानं प्रतिसाद दिल्यास पाकिस्तान उत्तर देण्यास तयार असल्याचं दार म्हणाले. 

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेकदा दावे

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शस्त्रसंधी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानला व्यापारासंदर्भात इशारा देत युद्ध थांबवण्यास सांगितल्याचं म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या संदर्भात अनेकदा दावे करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानचा वाद सोडवण्याची तयारी देखील ट्रम्प यांनी दर्शवली होती. भारताकडून पाकिस्तानसोबतचा संघर्ष थांबवण्यात तिसऱ्या पक्षाचा सहभाग नव्हता हे स्पष्ट केलं आहे. 

दरम्यान, भारताची पाकिस्तान संदर्भातील वाद किंवा समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप कायमस्वरुपी नाकारला आहे. भारतानं हा मुद्दा दोन देशांमध्येच ठेवला आहे. इशाक दार यांच्या वक्तव्यानं डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे चुकीचे ठरतात.