Pakistan Political Crisis : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या वैद्यकीय उपचारांसंदर्भात पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने दिलेल्या महत्त्वाच्या आदेशानंतर तिथल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या सूचनेनुसार इम्रान खान यांना रावळपिंडीच्या अदियाला जेलमधून इस्लामाबाद येथील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटल (Shifa International Hospital) मध्ये हलवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिफा रुग्णालयाभोवती पाकिस्तानी लष्कर (Pakistan Army) आणि इस्लामाबाद पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात करत संपूर्ण परिसराचा ताबा घेतला आहे.
तुरुंगात असलेल्या इम्रान खान यांच्या तब्येतीबाबत अनेकदा अफवा पसरल्याचं दिसून आलं. काही वेळा तर त्यांच्या निधनाच्या अफवाही समोर आल्या होत्या. त्यानंतर आता त्यांना तुरुंगातून रुग्णालयात शिफ्ट करण्यात येणार आहे.
सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने (Supreme Court of Pakistan) इम्रान खान यांच्या प्रकृतीचे गांभीर्य आणि आरोग्याचा अधिकार विचारात घेऊन त्यांना शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
तसेच कोर्टाने इम्रान खान यांच्या कुटुंबाला दर आठवड्याला त्यांची भेट घेण्याची परवानगी दिली आहे. त्यांच्या उपचारांसाठी एक विशेष मेडिकल बोर्ड (Medical Board) स्थापन करण्याचे आदेश दिले असून, यामध्ये इम्रान खान यांचे खाजगी डॉक्टर आणि त्यांची बहीण उझमा खान यांचा समावेश असेल.
शाहबाज शरीफ सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका
इम्रान खान यांना खाजगी रुग्णालयात हलवण्याच्या निर्णयाला विरोध करत पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांच्या सरकारने कोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रार कार्यालयाने ही याचिका अपूर्ण कागदपत्रांचे कारण देत फेटाळून लावली. सरकारचा असा युक्तिवाद होता की, हा निर्णय जेलच्या नियमांचे उल्लंघन करतो आणि यामुळे एका विशिष्ट कैद्याला विशेष सवलत दिल्यासारखे होईल. परंतु कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.
पीटीआयचा (PTI) मरियम नवाज यांच्यावर गंभीर आरोप
दरम्यान, इम्रान खान यांच्या 'पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ' (PTI) पक्षाने या विलंबामागे पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज (Maryam Nawaz) यांचा हात असल्याचा आरोप केला आहे. पीटीआयच्या नेत्यांच्या मते, कोर्टाचा स्पष्ट आदेश असतानाही मरियम नवाज यांच्या दबावामुळे इम्रान खान यांना रुग्णालयात हलवण्यास उशीर केला जात होता. आता लष्कराने रुग्णालयाची सुरक्षा ताब्यात घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात शिफ्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही बातमी वाचा:
