Bilawal Bhutto on Indus Water Treaty :  पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांनी "एकतर आमचे पाणी सिंधू नदीत वाहिल, नाहीतर त्यांचे रक्त वाहिल, असे वक्तव्य केले होते. बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यानंतर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता बिलावल भुट्टो यांनी सिंधू पाणी कराराबाबत केलेल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. रॅलीमध्ये फक्त पाकिस्तानातील सामान्य लोकांच्या भावनांचा पुनरुच्चार केला होता, असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतला आहे.

बिलावल भुट्टो यांनी पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानवर लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. पाकिस्तानला बलिचा बकरा बनवले जात आहे. आमचे पंतप्रधान आधीच पाकिस्तानमध्ये निष्पक्ष चौकशीची ऑफर देऊन झाले आहेत. जगभरातील अनेक देशांपेक्षा वेगळे वागून, पाकिस्तानने खरोखरच आपल्या चुका मान्य केल्या आहेत आणि भूतकाळातील या आरोपांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सुधारणा केल्या आहेत, बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे. 

बिलावल भुट्टोंचा मोठा दावा

बिलावल भुट्टो पुढे म्हणाले कि, "फक्त एवढंच नाही, तर मी परराष्ट्रमंत्री होण्याआधी पाकिस्तान एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये होता. पण जेव्हा मी परराष्ट्रमंत्री झालो, तेव्हा पाकिस्तान त्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडला. याचा अर्थ असा की आंतरराष्ट्रीय समुदायालाही हे मान्य आहे की आजच्या घडीला पाकिस्तानचा अशा कोणत्याही दहशतवादी गटाशी संबंध नाही. 

सिंधू नदीत रक्त सांडू म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोंचा यु-टर्न

सिंधू जल कराराबाबत दिलेल्या आपल्या वक्तव्यावर बिलावल भुट्टो स्पष्टता देताना म्हणाले की, "मी सीमारेषेवर हातात बंदूक घेऊन उभा नाही. मी सध्या सरकारमध्ये कोणतेही पदही सांभाळत नाही. भारताने जेव्हा या संधीचा भंग केला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी सिंधू नदीच्या काठावर एका राजकीय सभेला संबोधित करत होतो. सत्तेत असलेल्या सरकारने म्हटले आहे की,  सिंधू जल करारातून बाहेर पडण्याचा कोणताही निर्णय हा युद्धाची घोषणा मानला जाईल. मला खात्री आहे की, तुम्हाला माहित असेल, जेव्हा युद्ध होते तेव्हा रक्त सांडते. आमच्याकडे अशी कोणतीही नदी नाही की जी आम्ही भारताला प्रत्युत्तर म्हणून बंद करू शकू. जर भारत पाण्याला शस्त्र बनवून पाकिस्तानच्या नागरिकांविरोधात वापरत असेल, तर त्याचा अर्थ युद्धाची कारवाईच होईल. 

दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, जलशक्ती मंत्री आणि इतर अनेक नेत्यांनी बिलावल यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी म्हटले, "आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही." तर हरदीप सिंह पुरी यांनी खरमरीत प्रतिक्रिया देताना म्हटले, "त्यांनी आधी आपली मानसिक तपासणी करून घ्यावी. अशा प्रकारची विधाने कोणालाही शोभत नाहीत, अशी टीका केली होती. 

आणखी वाचा

Pakistan News: पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली! घाईघाईत बोलावली संसदेची आपत्कालीन बैठक, राष्ट्रपतींकडून नोटीस जारी