Pakistan News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) पाकिस्तानमध्ये (Pakistan) तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तानला भीती आहे की, भारत (India) कधीही त्याच्यावर हल्ला करू शकतो. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी राष्ट्रीय सभेची (National Assembly) आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ही बैठक 5 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता इस्लामाबाद येथील संसद भवनात होणार आहे.

पाकिस्तान सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत निवेदनानुसार, "इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या संविधानाच्या अनुच्छेद 54 च्या उपधारा (1) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करत, राष्ट्रपतींनी इस्लामाबाद येथील संसद भवनात सोमवार, 5 मे 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता राष्ट्रीय सभेची बैठक बोलावली आहे.

राष्ट्रीय सभेच्या (National Assembly) बैठकीत सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहतील. संसदेच्या या बैठकीत इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयची भूमिका काय आहे? पीटीआय पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना पाठिंबा देते की नाही?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, तुरुंगात असलेल्या इम्रान खानने एका निवेदनात म्हटले होते की, ते भारताविरुद्ध सरकारला पाठिंबा देतील. यापूर्वी, लष्करप्रमुखांनी त्यांच्या चार जनरलला इम्रान खान यांना मदत मागण्यासाठी तुरुंगात पाठवले होते.

पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सभेची बैठक कधी बोलावली जाते?

पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका असल्यास अशा आपत्कालीन बैठका बोलावल्या जातात. राष्ट्रपतींनी बोलावलेल्या राष्ट्रीय सभेच्या या विशेष बैठकीत सर्व पक्षांचे नेते, सुरक्षा तज्ञ आणि मंत्री उपस्थित राहतील. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 

भारतासोबतच्या तणावावर चर्चा होण्याची शक्यता

भारतासोबतच्या सध्याच्या तणावावर पाकिस्तानच्या संसदेत चर्चा होईल. यासोबतच, त्याच्या लष्करी आणि राजनैतिक प्रतिसादांचाही विचार केला जाईल. पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रतिसादावर पाकिस्तानी नेते ज्या पद्धतीने विधाने करत आहेत, त्यावरून असे दिसते की या बैठकीचा उद्देश देशांतर्गत सुरक्षेसाठी रणनीती तयार करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पाठिंबा मिळवणे असेल.

पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानशी सर्व राजनैतिक संबंध तोडले आहेत. यामध्ये सिंधू पाणी करार संपुष्टात आणणे हा सर्वात मोठा निर्णय मानला जात आहे. यामुळे शेजारील देशात खळबळ उडाली आहे. याशिवाय, भारत सरकारने देशात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत आणि त्यांना परत पाकिस्तानला पाठवत आहेत. दरम्यान, पाकिस्तान भारताला सतत धमक्या देत आहे. बिलावल भुट्टो यांनी तर सिंधू नदीत पाण्याऐवजी रक्त सांडण्याबद्दलही बोलले. पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर देखील सतत बैठका घेत आहेत, यावरून स्पष्ट होते की पाकिस्तान खरोखरच घाबरला आहे. यामुळेच पाकिस्तान सीमेवर सायरन बसवत आहे आणि सतत क्षेपणास्त्रांची चाचणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.  

आणखी वाचा 

Pahalgam Terror Attack : भारताने हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी अडवलं, तर अण्वस्त्रांनी उत्तर देऊ; पाकिस्तानकडून पोकळ धमक्या देणं सुरूच