Asim Munir On India : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर (Asim Munir) यांनी पुन्हा एकदा भारताच्या विरोधात वक्तव्य केले आहे. ऑपरेशन सिंदूरच्या (Operation Sindoor) पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, भारताने कोणत्याही चिथावणीशिवाय पाकिस्तानविरुद्ध कारवाई केली होती. त्यांनी भारताला इशारा देण्याचाही प्रयत्न केला. हा कार्यक्रम रावळपिंडी येथील जनरल हेडक्वार्टर्स (GHQ) मध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाकिस्तानचे (Pakistan) हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर सिद्धू आणि नौदलप्रमुख ॲडमिरल नवीद अश्रफ हेही उपस्थित होते.

Asim Munir On India : भारताने केलेल्या कृती 'फॉल्स फ्लॅग ऑपरेशन्स, असिम मुनीर यांची वल्गना

असिम मुनीर यांनी म्हटले की, भारताने 6 आणि 7 मे च्या रात्री पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले होते आणि पाकिस्तानने पूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर दिले होते. त्यांनी म्हटले की, भविष्यात पाकिस्तानविरुद्ध अशा कोणत्याही कारवाईचे विनाशकारी आणि वेदनादायक परिणाम होतील. मुनीर यांनी असेही म्हटले की, मराका-ए-हक हे केवळ दोन देशांमधील युद्ध नव्हते, तर वैचारिक लढाई होती. त्यांनी दावा केला की ही लढाई पाकिस्तानने जिंकली आहे. त्यांनी 2001 च्या संसद हल्ल्यानंतर, 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर, 2016 च्या उरी हल्ल्यानंतर आणि 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कृतींना 'फॉल्स फ्लॅग ऑपरेशन्स' (खोट्या कारवाया) असेही संबोधले. खोटे आरोप करून भारत पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो, असा आरोपही त्यांनी केला.

India on Pakistan : दहशतवादाविरोधातील कारवाई सुरूच राहील – भारत

भारताने हे आधीच स्पष्ट केले आहे की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधातील कारवाई सुरूच राहील. गेल्या वर्षी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, ज्यात २६ जण ठार झाले. याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने 7 मे रोजी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ प्रमुख दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या भारतीय कारवाईत 100 हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त समोर आले. त्यानंतर पाकिस्तानकडून हल्ले झाले, परंतु भारताने अनेक पाकिस्तानी लष्करी तळ, हवाई तळ आणि रडार केंद्रांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले. 10मे पर्यंत परिस्थिती इतकी चिघळली होती की पाकिस्तानने शस्त्रसंधीचे आवाहन केले, जे भारताने स्वीकारले.

हे सुद्धा वाचा