नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेला संघर्ष सध्या शांत झालेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतानं ऑपरेशन सिंदूर द्वारे घेतला. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील एकूण 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करत ते उद्धवस्त केले. यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारताच्या लष्करी ठिकाणांवर ड्रोन, मिसाईल हल्ले करण्याचा प्रयत्न केले. भारताच्या इंडियन आर्मी आणि हवाई दलानं ते हल्ले परतावून लावले. याशिवाय पाकिस्तानच्या लष्करी तळांवर हल्ले देखील केले. यामध्ये पाकिस्तानच्या लष्करी तळांचं मोठं नुकसान झालं. हा तणाव वाढलेला असतानाच पाकिस्तानकडून अणवस्त्राचा वापराच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. भारत कधीही अणवस्त्राच्या धमकीला घाबरणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.आमच्या सैन्यात शत्रूच्या अणुबॉम्बची ताकद काढून घेण्याची धमक आहे, असा इशारा नरेंद्र मोदी यांनी दिला होता.

अणवस्त्रचा उल्लेख होताच...

जगभरात रशिया युक्रेन युद्ध सुरु आहे, ते संपलेलं नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून युक्रेनवर अणवस्त्राचा हल्ला होईल अशा चर्चा अनेकदा झाल्या होत्या. मात्र, पुतिन यांनी तो मार्ग वापरलेला नाही. जगानं दुसऱ्या महायुद्धात अणवस्त्राच्या वापरानं काय होतं ते पाहिलेलं आहे. अमेरिकेनं जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणवस्त्र हल्ला केला होता, त्याचा आठवणींनी अजूनही थरकाप उडतो.  

अणुबॉम्ब कसा असतो?

अणुबॉम्ब एक स्फोटक शस्त्र आहे. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही अणवस्त्रधारी देश आहेत. अणूबॉम्बमध्ये अणू विखंडन होते, त्यामुळं प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर फेकली जाते. अणू तूटतो आणि त्याचं रुपांतर लहान लहान अणूंमध्ये होतं, त्याला फिशन प्रक्रिया म्हटलं जातं. अणूंचं जेव्हा विखंडन होतं तेव्हा त्यातून न्यूट्रॉन्स बाहेर पडतात ते इतर अणूंना तुटण्यास संप्रेरक ठरतात. याचा वेग अनियंत्रित असतो. यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. 

अणुबॉम्बमध्ये कशाचा वापर?

कोणत्याही अणुबॉम्बची निर्मिती करण्यासाठी यूरेनियम किंवा प्लुटोनियमची आवश्यकता असते. अणुबॉम्ब तयार करण्यासाठी यूरेनियम-233 आणि प्लुटोनियम-239 चा वापर होतो. यूरेनियम आणि प्लुटोनियम यांच्या अणूच्या विखंडनातून ऊर्जा तया होते. अणूच्या केंद्रावर न्यूट्रॉनचा प्रहार केला जातो. यातून मोठी ऊर्जा तयार होते. याला नाभिकीय विखंडन म्हटलं जातं. जेव्हा एखाद्या अणू बॉम्बेचा स्फोट केला जातो त्यानंतर रेडिओ एक्टिव्ह तरंग निघतात. यामुळं सर्वाधिक नुकसान होतं. 

अणुबॉम्ब किती नुकसान करतो?

जगभरातील विविध देशांकडे वेगवेगळ्या प्रकारची अणवस्त्र आहेत. काही खूपधोकादायक आहेत, जी एखाद्या शहराला काही मिनिटात बेचिराख करु शकतात. ज्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकला जातो तिथल्या जीवसृष्टीचं अस्तित्व संपू शकतं. त्या ठिकाणची जमीन ओसाड होऊ शकते. ज्यामुळं तिथं झाडं झुडपं देखील येऊ शकत नाहीत.  

जगभरात 9 देशांकडे अणवस्त्र आहेत. यामध्ये रशिया, अमेरिका, चीन, फ्रान्स, यूनायटेड किंग्डम, पाकिस्तान, भारत,इस्त्रायल, उत्तर कोरिया या देशांचा समावेश आहे. जगभरातील 90 टक्के अणवस्त्र रशिया आणि अमेरिकेकडे आहेत. भारताकडे 180 अणवस्त्र आहेत तर पाकिस्तानकडे 170 अणवस्त्र आहेत. जगभरातील एकूण अणवस्त्रांची संख्या 12331 इतकी आहेत.