NO Kings Protest In America: "आम्हाला राजा नको, लोकशाही हवी!" या गर्जनेने सध्या संपूर्ण अमेरिका हादरून गेली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील 'हुकूमशाही' निर्णयांविरुद्ध आणि इराणसोबतच्या युद्धाला महिना पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे 'नो किंग्स' (No Kings) आंदोलन पुकारण्यात आले. 50 राज्यांतील 3300 शहरांमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले असून, ट्रम्प प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली.
मिनेसोटात जनसागराचा उद्रेक: शहीद नागरिकांना श्रद्धांजली
या वेळच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र मिनेसोटा राज्यातील 'मिनियापोलिस-सेंट पॉल' हे क्षेत्र बनले. डिसेंबरमध्ये ट्रम्प यांनी राबवलेल्या 'ऑपरेशन मेट्रो सर्ज' अंतर्गत 3000 फेडरल एजंट्सनी सामान्य नागरिकांवर अमानुष बळाचा वापर केला होता.यात 'अॅलेक्स प्रेटी' आणि 'रेनी निकोल गुड' या दोन निष्पाप अमेरिकन नागरिकांची हत्या करण्यात आली होती. हा जाब विचारण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मिनेसोटामध्ये जनसागराचा महापूर लोटला.
आम्ही हुकूमशाही खपवून घेणार नाही
- केवळ सामान्य जनताच नाही, तर अमेरिकेतील दिग्गज कलाकार आणि नेतेही या आंदोलनात हिरिरीने सहभागी झाले आहेत.
- रॉबर्ट डी निरो: प्रसिद्ध अभिनेते डी निरो यांनी निदर्शकांचे कौतुक करताना ट्रम्प प्रशासनाच्या एजंट्सना 'सरकारी गुंड' संबोधले. "तुम्ही या सशस्त्र गुंडांच्या हल्ल्याचा धैर्याने सामना केलात," अशा शब्दांत त्यांनी आंदोलकांना स्फुरण चढवले.
- बर्नी सँडर्स: बर्नी सँडर्स यांनी स्पष्ट इशारा दिला की, "आम्ही या देशाला हुकूमशाही किंवा मूठभर श्रीमंतांच्या (Oligarchy) सत्तेकडे झुकू देणार नाही."
- रॉक आयकॉन ब्रूस स्प्रिंगस्टीन आणि जोन बाएझ यांच्या गाण्यांनी आंदोलनात नवी ऊर्जा भरली आहे.
राजधानीत ट्रम्प यांच्या पुतळ्यांची होळी
राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील 'लिंकन मेमोरियल' आणि 'वॉशिंग्टन मोन्युमेंट'समोर अभूतपूर्व गर्दी झाली. निदर्शकांनी केवळ ट्रम्पच नव्हे, तर त्यांचे उजवे हात मानले जाणारे जे.डी. वान्स आणि पीट हेगसेथ यांचे कागदी पुतळे हातात घेऊन आपला तीव्र निषेध नोंदवला. "ट्रम्प प्रशासनाचा अंत जवळ आला आहे," अशा घोषणांनी वॉशिंग्टनचा परिसर दणाणून गेला आहे.
ट्रम्प यांची 'विष्ठा' फेकणारी पोस्ट
या आंदोलनामुळे संतापलेल्या ट्रम्प यांनी गेल्या वेळी आंदोलकांवर विष्ठा फेकणारा एक 'AI व्हिडिओ' पोस्ट केला होता. मात्र, ट्रम्प यांच्या अशा वागण्यामुळे त्यांची लोकप्रियता कमालीची घटली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणाऱ्या 'मध्यावधी निवडणुकां'मध्ये (Midterm Elections) या जनक्षोभाचा मोठा फटका ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पार्टीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोम, पॅरिस आणि बर्लिनमध्येही निदर्शने
हे आंदोलन केवळ अमेरिकेपुरते मर्यादित राहिलेले नाही. ट्रम्प यांच्या युद्धखोर धोरणांविरुद्ध रोम, पॅरिस आणि बर्लिनसारख्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्येही लोक रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिकेतील ग्रामीण आणि पुराणमतवादी भागांतही आता ट्रम्प यांच्याविरुद्ध असंतोष पसरू लागल्याने हे आंदोलन 'ऐतिहासिक' ठरले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
