कॅनडामध्ये 2019 मध्ये पंतप्रधान पदासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी लिबरल पार्टीच्या जस्टिन ट्रूडो यांच्याविरोधात ‘न्यू डेमोक्रेटिक पक्षा’ने भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांना मैदानात उतरवलं आहे. पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चिती करण्यासाठी पक्षांतर्गत झालेल्या निवडणुकीत जगमीत सिंह यांना 54 टक्के मतं मिळाली.
त्यांना पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर, पक्षाचं नेतृत्व करणारे पहिले कृष्णवर्णीय ठरले आहेत. पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, जगमीत यांनी ट्वीट करुन सर्वांचे आभार मानले. तसेच पंतप्रधान पदासाठीची स्पर्धा आजपासून सुरु झाली असल्याचंही त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
जगमीत यांचा अल्प परिचय
जगमीत यांनी राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी वकीली क्षेत्रातही काम केलं. त्यांचा जन्म 2 जानेवारी 1979 रोजी कॅनेडाच्या ओंटारियाच्या स्कारबोरोमध्ये झाला. त्यांचे आई-वडील पंजाबमधून कॅनेडात स्थाईक झाले. जगमीत यांनी 2001 मध्ये वेस्टर्न ओंटारियो विद्यापीठातून जीवविज्ञान शास्त्रातून पदवी घेतली. त्यानंतर 2005 मध्ये यॉर्क विद्यापीठातंर्गत येणाऱ्या ओस्गुड हॉल लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी मिळवली.
दरम्यान, गेल्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत न्यू डेमोक्रेट पक्षाने 338 जागांपैकी 44 जागांवर विजय मिळवत, देशातला तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. यंदा भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांना उमेदवारी मिळाल्याने, पक्षाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत.