Middle East Crisis: मिडल ईस्ट (Middle East) परिसरात पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाची शक्यता निर्माण झाल्याने अमेरिका (United States) प्रशासनाने आपल्या नागरिकांसाठी महत्त्वाचा सुरक्षा इशारा जारी केला आहे. जॉर्डन (Jordan), इस्रायल (Israel) आणि इराक (Iraq) येथील अमेरिकन दूतावासांनी नागरिकांना परिस्थिती बिघडल्यास तातडीने प्रदेश सोडण्याची तयारी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकेच्या सुरक्षा सूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे की, मिडल ईस्ट (Middle East) मध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी शक्य असल्यास हा प्रदेश सोडण्याचा विचार करावा किंवा परिस्थिती गंभीर झाल्यास त्वरित बाहेर पडण्यासाठी आवश्यक तयारी करून ठेवावी.

Continues below advertisement

Middle East Crisis: अमेरिकेचा नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट

अम्मान (Amman), जेरुसलेम (Jerusalem) आणि बगदाद (Baghdad) येथील अमेरिकन दूतावासांनी नागरिकांना त्यांच्या विमान प्रवासाबाबत सातत्याने माहिती घेत राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सर्व सुरक्षा सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.  अमेरिकेने इशारा दिला आहे की, प्रदेशातील वाढत्या तणावामुळे विमानसेवा अचानक रद्द होऊ शकते, हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले जाऊ शकते आणि प्रवासात मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

Middle East Crisis: जॉर्डन आणि इस्रायलमधील नागरिकांसाठी वेगळ्या सूचना

जॉर्डन (Jordan) मध्ये राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना नुकत्याच इराण (Iran) समर्थित हल्ल्यांचे लक्ष्य ठरलेल्या अमेरिकन लष्करी तळांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर इस्रायल (Israel) मधील नागरिकांना त्यांच्या जवळील बॉम्ब शेल्टर कुठे आहे, याची आधीच माहिती करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Continues below advertisement

जेरुसलेम येथील अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इराण सरकारचे वर्तन सध्या पूर्णपणे अनिश्चित आहे. अलीकडच्या काळात कोणतीही पूर्वसूचना न देता विविध भागांवर हल्ले करण्यात आले असून, पूर्वी लक्ष्य नसलेल्या इजिप्त सारख्या प्रदेशांपर्यंत हल्ल्यांचा विस्तार करण्यात आला आहे.

Middle East Crisis: अमेरिकन जहाजावर ड्रोन हल्ला

बुधवारी इजिप्त मधील एका बंदरात उभ्या असलेल्या अमेरिकेच्या मालकीच्या गॅस जहाजावर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली. या घटनेची चौकशी इजिप्त प्रशासनाकडून सुरू असून, अद्याप कोणत्याही देशावर किंवा संघटनेवर अधिकृतपणे आरोप करण्यात आलेला नाही.

Middle East Crisis: इराणचा अमेरिकेला थेट इशारा 

दरम्यान, इराणच्या लष्कराने अमेरिकेवर प्रदेशातील तणाव वाढवल्याचा आरोप केला आहे. तसेच अमेरिकेचे संरक्षण करणारा किंवा त्याला मदत करणारा कोणताही देश युद्धाच्या आगीत सापडेल, असा इशाराही इराणने दिला आहे.

Middle East Crisis: पुन्हा वाढला संघर्ष

काही दिवसांच्या शांततेनंतर या आठवड्यात पुन्हा अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्याचे दिसून आले. रात्रीच्या वेळी हल्ल्यांच्या घटना पुन्हा सुरू झाल्या असल्या तरी शुक्रवारी आणि शनिवारी नवीन हल्ल्यांची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मिडल ईस्टमधील वाढत्या अस्थिरतेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष या भागाकडे लागले असून, येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'