नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशातील युद्धजन्य (War) परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना महत्त्वाचे आवाहन केले असून पेट्रोल-डिझेलच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचे सूचवले आहे. तसेच, परदेश दौरे टाळा, विदेशी चलन वापरात येणाऱ्या वस्तूंची खरेदी करू नये, वर्षभर सोन्याचे दागिने खरेदी करू नये, असेही आवाहन नरेंद्र मोदींनी भारतीय नागरिकांना केले आहे. त्यामुळे, देशभरात आगामी युद्धजन्य परिस्थिवरुन काळजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे देशाचे परराष्ट्र् मंत्रालय (MEA) देखील परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे. त्याच पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांतील लाखो भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आत्तापर्यंत, 2500 हून अधिक भारतीयांना इराणहून (Iran) मायदेशी आणण्यात आले आहे. 

केंद्रीय मंत्रालयात आज झालेल्या बैठकीतील माहितीनुसार, युद्धजन्य परिस्थिती अजूनही संवेदनशील असली तरी भारतीय नागरिकांच्या मायदेशी परतण्यासाठी आणि सागरी व्यापार सुरळीत ठेवण्यासाठी समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त सचिव असीम महाजन यांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्रालय 24 तास परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच विविध राज्य सरकारांशी संपर्क ठेवत स्व‍कीयांच्या काळजीत असलेल्या कुटुंबांना माहिती पुरविण्याचे काम सुरू आहे. आखाती देशातील काही भागांमध्ये निर्बंध कायम असले तरी एकूण हवाई संपर्क सुधारत आहे. तेहरानच्या परराष्ट्र खात्याच्या माध्यमातून स्थलमार्गाने 2549 भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात यश आले आहे. तसेच, भारतीय नागरिकांना सध्या इराणचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विमानसेवा सुरू, सागरी वाहतूकही सुरळीत

संयुक्त अरब अमिरातीचे हवाई क्षेत्र खुले असून भारतीय आणि यूएई विमान कंपन्या भारतासाठी उड्डाणे चालवत आहेत. सौदी अरेबिया आणि ओमानमधूनही उड्डाणे सुरू आहेत. कतारचे हवाई क्षेत्र अंशतः खुले असून एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, इंडिगो आणि कतार एअरवेजच्या सेवा सुरू आहेत. कुवेत आणि बहरीनचे हवाई क्षेत्र देखील आपल्यासाठी खुले आहे, असे महाजन यांनी सांगितले. इराकमध्ये मर्यादित उड्डाण सेवा सुरू आहेत. इराणचे हवाई क्षेत्र अंशतः खुले असले तरी भारतीयांना तेथे प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इस्रायलचे हवाई क्षेत्रही खुले असून मर्यादित विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, सागरी संघर्षाचा धोका कायम असतानाही पोर्ट आणि जहाज वाहतूक मंत्रालयाने भारतीय जहाजांसाठी परिस्थिती सध्या तुलनेने चांगली असल्याचे असीम महाजन यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

आखातातील खलाशी सुरक्षित - शर्मा

पोर्ट मंत्रालयाचे संचालक ओपेश कुमार शर्मा यांनी सांगितले की, गेल्या तीन दिवसांत भारतीय ध्वज असलेल्या व्यापारी जहाजांशी किंवा परदेशी ध्वज असलेल्या जहाजांवरील भारतीय खलाशांशी संबंधित कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय, परदेशातील भारतीय दूतावास आणि सागरी क्षेत्रातील सर्व संबंधित संस्थांशी सातत्याने समन्वय साधत आहे, जेणेकरून खलाशांचे कल्याण आणि अखंड सागरी कामकाज सुनिश्चित करता येईल. आखातातील सर्व भारतीय खलाशी सुरक्षित असल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, खाद्यतेलाचा कमी वापर करा; नरेंद्र मोदींची देशवासियांना 10 मोठी आवाहनं