Kim Jong Un Viral Video: उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यात बीजिंगमध्ये नुकतीच एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. मात्र, या बैठकीनंतर घडलेल्या एका अनोख्या घटनेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चर्चा संपल्यानंतर किम जोंग उन यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ पळत येत, त्यांच्या स्पर्शाचा प्रत्येक ठसा अत्यंत काळजीपूर्वक पुसून टाकला. हे पाऊल त्यांच्या डीएनए सुरक्षेच्या दृष्टीने उचलले गेले असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ फुटेजमध्ये दिसते की, किम यांच्या स्टाफने त्यांनी बसलेली खुर्ची, तिची पाठ, हात ठेवण्याची जागा आणि बाजूचा टेबल यांची बारकाईने सफाई केली. त्यांनी वापरलेला पाण्याचा ग्लासही खास ट्रेमध्ये ठेवून लगेच बाहेर नेण्यात आला. "चर्चा संपल्यानंतर, किम यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उपस्थितीचे सर्व पुरावे अत्यंत काळजीपूर्वक नष्ट केले," अशी माहिती रशियन पत्रकार अलेक्झांडर युनाशोव्ह यांनी त्यांच्या चॅनेलवर दिली.

सुरक्षेवरून निर्माण झालेल्या शंका

या फॉरेन्सिकसदृश स्वच्छतेमागे नेमकी काय कारणं आहेत हे स्पष्ट नाही. मात्र, अंदाज लावला जात आहे की हे पाऊल रशियन गुप्तचर संस्था किंवा चीनच्या देखरेखीपासून वाचण्यासाठी उचलले गेले असावे. असं मानलं जातं की किम जोंग उन हे एकमेव नेते नाहीत जे त्यांच्या DNA बाबत इतकी काळजी घेतात.

पुतीनसुद्धा घेतात त्यांच्या DNA ची काळजी

रिपोर्ट्सनुसार, पुतीनही त्यांच्या विदेश दौऱ्यांदरम्यान त्यांच्या DNA ची सुरक्षा करण्यासाठी कठोर उपाय करतात. असं सांगितलं जातं की, त्यांच्या बॉडीगार्ड्सकडून त्यांची लघवी आणि विष्ठा विशिष्ट बॅगमध्ये भरून पुन्हा मॉस्कोला नेले जाते, जेणेकरून कोणत्याही शत्रूराष्ट्राला त्यांच्या तब्येतीची माहिती मिळू नये. ही प्रक्रिया 2017 पासून सुरू असल्याचे सांगितले जाते.

चीन आणि रशियासोबत किम जोंग उन यांची जवळीक वाढली

या भेटीत किम जोंग उन यांनी पुतीन यांना आश्वासन दिलं की, ते रशिया आणि रशियन जनतेसाठी शक्य तेवढा पाठिंबा देतील. दोघांमध्ये चहा पिताना अनौपचारिक चर्चा झाली. रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियाने रशिया-युक्रेन युद्धात स्वतःचे सैनिक पाठवले असून, त्यापैकी सुमारे 2,000 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

ही यात्रा किम जोंग उन यांची महामारीनंतरची पहिली चीन यात्रा होती. या वेळी त्यांना पुतीन, शी जिनपिंग आणि इतर 20 हून अधिक देशांच्या नेत्यांशी भेटण्याची संधी मिळाली. 2024 मध्ये झालेल्या संरक्षण करारानंतर रशिया आणि उत्तर कोरियामधील संबंध आता गेल्या अनेक दशकांतील सर्वोच्च पातळीवर असल्याचे मानले जात आहे.

आणखी वाचा 

Shabana Mahmood: ब्रिटन सरकारमध्ये फेरबदल अन् पाकव्याप्त काश्मीरमध्ये आनंदाला उधाण! शबाना महमूद आहेत तरी कोण?