Kash Patel : भारतीय वंशाचे काश पटेल अमेरिकेतील सर्वशक्तीमान FBI चे नवे प्रमुख, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय; अयोध्येतील राम मंदिराचं केलं होतं समर्थन
Kash Patel New FBI Director : भारतीय वंशाचे काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांचे अत्यंत विश्वासू असून त्यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीतही सोबत काम केलं होतं.
मुंबई : भारतीय वंशाचे काश पटेल आता अमेरिकेतील तपास यंत्रणा FBI (Federal Bureau of Investigation) चे नवे अध्यक्ष असतील. अमेरिकेचे नवनियुक्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. एफबीआय या तपास संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणारे ते पहिलेच भारतीय अमेरिकन व्यक्ती असतील. काश पटेल (वय 44) यांचे मूळ नाव कश्यप पटेल असं असून ते अमेरिकेतील एक प्रसिद्ध वकील आहेत. अयोध्येत ज्यावेळी राम मंदिराची निर्मिती केली होती त्यावेळी त्याचं समर्थन काश पटेल यांनी केलं होतं.
डोनाल्ड ट्र्प्म यांनी त्यांच्या सोशल मीडियावर काश पटेल यांच्या नियुक्तीसंदर्भात माहिती दिली आहे. काश पटेल यांची एफबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती करताना आम्हाला अभिमान वाटतोय असं ट्रम्प यांनी म्हटलंय.
काश पटेल यांनी 2017 साली, डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात चीफ ऑफ स्टाफ ऑफ डिफेन्स सेक्रेटरी म्हणून काम पाहिलं होतं.
Who is Kash Patel : हिंदू धर्मावर श्रद्धा असणारे काश पटेल कोण आहेत?
काश पटेल यांचे मूळ गुजरातमधील असल्याची माहिती आहे. काश पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू असल्याचे सांगितले जाते. याशिवाय काश पटेल यांचीही हिंदू धर्मावर प्रचंड श्रद्धा आहे. हिंदू धर्माशी असलेला संबंधही त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केला आहे. त्याचबरोबर भारतातील अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या वेळी त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला होता. अमेरिकेत काही संघटनांनी राम मंदिराबाबत प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हा काश पटेल यांनी उघडपणे त्या संघटनांवर टीका केली होती.
राम मंदिराबाबत कोणत्या संघटनांनी प्रश्न उपस्थित केला होता?
यूएस कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडमने भारतात राम मंदिराच्या बांधकामाबाबत चिंता व्यक्त केली होती. आयोगाने व्हॉईस ऑफ अमेरिकाला सांगितले होते की, भारतातील राम मंदिराच्या उभारणीमुळे ते अत्यंत त्रस्त आहेत. याशिवाय न्यूयॉर्क टाइम्स आणि सीएनएननेही राम मंदिराबाबत हिंदूंच्या भावनांविरोधात बातम्या केल्या होत्या. तेव्हा भारतीय-अमेरिकन काश पटेल यांनी राम मंदिराबाबत भूमिका घेतली होती. पटेल म्हणाले होते की, अमेरिकन मीडिया फक्त गेल्या 50 वर्षांचा इतिहास पाहत आहे पण या मंदिराचा इतिहास हजारो वर्षांचा आहे.
काश पटेल यांनी त्यावेळी सांगितले होते की, भारतातील अयोध्येतील त्या ठिकाणी हिंदू देवाचे खूप जुने मंदिर होते, ते नंतर पाडण्यात आले होते. आता 500 वर्षांनंतर हिंदू अनुयायांना ते परत मिळत आहे.लोक इतिहासाचा हा भाग विसरत आहेत.