Tel Aviv Attack : इस्त्रायलच्या तेल अवीव विमानतळावर हुथी बंडखोरांचा क्षेपणास्त्र हल्ला, एअर इंडियासह सर्व विमानसेवा रद्द
Israel Tel Aviv Airport Attack : यमनमधील हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यांना योग्य ते प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा इस्त्रायलने दिला आहे.

मुंबई : इस्त्रायलमधील तेल अवीव शहरातील विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला (Israel Tel Aviv Airport Attack) झाल्यानंतर सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भारताची एअर इंडिया, ब्रिटिश एअरवेज, लुफ्थांसा आणि डेल्टा एअरलाईन्स यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय विमान सेवांचा समावेश आहे. इस्त्रायलच्या तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळावर (Ben Gurion Airport) हा हल्ला झाला आहे. यमनमधील हुथी बंडखोरांनी हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा हल्ला (Houthi Missile Strike) केला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आठ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
बेन गुरियन विमानतळाजवळ हल्ला
येमेनमधील हूथी बंडखोरांनी (Yemen's Houthi rebels) इस्त्रायलच्या दिशेने डागलेली एक क्षेपणास्त्र तेल अवीवमधील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ कोसळले. हल्ल्यानंतर परिसरात धुराचे लोट पसरले आणि प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. इस्त्रायली आपत्कालीन सेवेनुसार, आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.
Air India Flights To Tel Aviv : एअर इंडिया आणि इतर कंपन्यांचे उड्डाणे रद्द
एअर इंडियाने आपल्या दिल्लीतून तेल अवीवकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व उड्डाणांना 6 मे 2025 पर्यंत स्थगिती दिली आहे. एअर इंडियाने एका निवेदनात सांगितले की, प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला असून ग्राहकांना पर्यायी व्यवस्था करून देण्याचे काम सुरू आहे.
ब्रिटिश एअरवेजनेही 7 मेपर्यंत BA-405 सहित सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. जर्मनीची लुफ्थांसा, डेल्टा, युरोविंग्स, स्विस, ऑस्ट्रियन, आणि ब्रुसेल्स एअरलाईन्स या कंपन्यांनीदेखील सेवांवर तात्पुरती बंदी घातली आहे.
Flights again halted to Israel after Houthi missile lands near airport https://t.co/CS2UKfW5o3 https://t.co/CS2UKfW5o3
— Reuters (@Reuters) May 4, 2025
हुथी बंडखोरांनी जबाबदारी स्वीकारली
यमनमधील हुथी बंडखोरांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, बेन गुरियन विमानतळ (Ben Gurion Airport) आता आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी सुरक्षित नाही, असा इशारा दिला आहे. इस्त्रायलच्या संरक्षणमंत्री इस्राएल कॅट्झ यांनी या हल्ल्याला कठोर प्रत्युत्तर देणार असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यामुळे इस्त्रायलमधील सुरक्षा यंत्रणांमध्ये तणाव निर्माण झाला आहे आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी नवीन सुरक्षा उपायांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
ही बातमी वाचा:


















